मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 09:14 AM2023-11-22T09:14:07+5:302023-11-22T09:14:41+5:30
जरांगे-पाटील; २५ डिसेंबरनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सरकार कोणाचेही असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. आरक्षण दिल्याखेरीज सरकारची सुटका नाही. आरक्षण देण्याकरिता विशेष अधिवेशनाची गरज नाही. योगायोगाने हिवाळी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात केले.
सापडलेल्या कुणबी नोंदी लक्षात घेऊन सरकारने आरक्षण द्यावे, अन्यथा २५ डिसेंबरनंतर होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील सभेत मराठा बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांनाही आरक्षण द्यावे, असे ग्रामीण भागातील ओबींसींचेही मत आहे. मी अंतरवालीला जायच्या आतच टाइमबॉन्ड आरक्षण जाहीर करा.
भुजबळांच्या डोळ्यात मीच खुपतोय
कल्याण : भुजबळांना संताजी-धनाजीसारखा आता सगळ्या ठिकाणी मीच दिसतोय. त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. मात्र, वैयक्तिक टीका करून सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार, असे मनोज जरांगे यांनी सोमवारी रात्री पोटे मैदानात झालेल्या सभेत सांगितले.
माझ्या पाठीमागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. मी कुणाचीही स्क्रिप्ट वाचत नसतो. वाचून माणूस एवढे बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. मीरा-भाईंदर, बोईसर येथेही जरांगे यांच्या जाहीर सभा झाल्या.
मनोज जरांगे यांच्यासाठी गडकरी रंगायतनच्या व्यासपीठावर मोठी खुर्ची ठेवली होती, परंतु संपूर्ण भाषण त्यांनी उभे राहून केले.
बंदिस्त सभागृहात भाषणाची सवय नसल्याची कबुली त्यांनी दिली. मराठा मैदानात लढणारा असून पुढील सभा ठाण्यात मोकळ्या मैदानात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.