संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा दोष असेल, तर त्यांनाही शिक्षा : ॲड. उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:53 AM2024-08-22T05:53:38+5:302024-08-22T05:54:34+5:30
बदलापूर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचे लेखी आदेश सरकारकडून अजून प्राप्त झालेले नाहीत.
ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेचा पदाधिकारी दोषी असेल, त्याच्याविरुद्ध पुरावे आढळले तर प्रकरण तडीस नेणार. तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचा विश्वास बदलापूर अत्याचार प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
बदलापूर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचे लेखी आदेश सरकारकडून अजून प्राप्त झालेले नाहीत. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला याबाबत तोंडी विचारणा केल्यानंतर आपण त्याला सहमती दर्शविल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले. विरोधी पक्षाने आपल्यावर घेतलेले आक्षेप खोडून काढताना ते म्हणाले, केवळ लोकसभेची निवडणूक लढवली म्हणजे मी विकला गेलो, असे होत नाही. २६/११ च्या कसाबच्या हल्ल्यात हेमंत करकरेंना मारले, त्यावेळी आरएसएसने त्यांना मारल्याचा जावईशोध याच व़डेट्टीवारांनी लावला होता. नंतर एका पुस्तकाच्या आधारे आपण बोलल्याचे ते म्हणाले.
परंतु, यात तथ्य नव्हते. १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात सिनेअभिनेत्याला वाचविण्यासाठी सर्व बाजूंनी खटाटोप झाला. तेव्हा तर राज्य आणि केंद्रातही काँग्रेसचे सरकार होते. पण त्यावेळीही आपण प्रकरण धसास लावले. मुळात बदलापूरच्या आंदोलनावेळी लोकांची मागणी होती की, ॲड. निकम यांच्याकडे विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी द्यावी. त्याला गिरीश महाजन यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळेच राज्य सरकारने आपली नियुक्ती केली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सर्व बाजू पडताळून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला शिक्षा होण्यासाठी आपण भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचे ॲड. निकम म्हणाले.
आरोपीला फासावर लटकवणे हेच ध्येय : शंभूराज देसाई
बदलापूर : बदलापुरातील घटनेनंतर सरकारने जे काही कठोर निर्णय घ्यायचे होते, ते घेतलेले आहेत. आरोपीला फाशीच्या दारात पोहोचविण्याचे काम सरकार करेल आणि त्यात कुठेही कमी पडणार नाही, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी व्यक्त केले. पालकमंत्री देसाई हे घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते.