कविता आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही : डॉ. विनोद इंगळहळीकर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 14, 2024 01:54 PM2024-07-14T13:54:44+5:302024-07-14T13:55:19+5:30

टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य सादरीकरण स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडली.

if the poem is not felt by us it cannot be conveyed properly to others said dr vinod ingalhalikar | कविता आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही : डॉ. विनोद इंगळहळीकर

कविता आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही : डॉ. विनोद इंगळहळीकर

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कविता निवडताना प्रथम ती आपल्याला भावली आहे का हे तपासावे. जर कविता ती आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही. आपल्याला भावलेली कविता ही नीट सादर करता आली पाहिजे. कविता सादर करताना प्रकृतीनुसार कविता म्हणायला योग्य आहे का हे नीट तपासले पाहिजे असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ आणि जेष्ठ कवी डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी व्यक्त केले. 

टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य सादरीकरण स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडली. या स्पर्धेत ७५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही फेरी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या स्पर्धेचे परीक्षण करतेवेळी आलेले अनुभव डॉ. इंगळहळीकर यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतातून ते म्हणाले की, कविता सादरीकरणाला एक ठराविक कालावधी असतो, ती खूप छोटीही नसावी आणि खूप लांबलचक नसावी. कवीला काय म्हणायचं आहे हे सादरकर्त्याला समजले पाहिजे. कवितेचे पाठांतर असे हवे की, स्टेजवर गेल्यावर तुम्ही गांगरले तरी त्याची चूक होता कामा नये. आपण श्रोत्यांकरता वाचतोय असे आपल्या सादरीकरणातून वाटले पाहिजे. कवितेच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कविता वाचणाऱ्याची देहबोली ही महत्त्वाची असते. कवितेतील रटाळपणा हा टाळावा.

कवितेच्या शेवटच्या वाक्याच्या शब्दाला पूर्णत्व असावे. कविता वाचताना प्रत्येक चिन्हाचा वापर योग्य असावा मात्र कित्येक लोकांना याची समज नसते. कविता वाचताना ओळींमध्ये चढ-उतार असावे.  काही वाक्य आवर्जून संथपणे  वाचावी लागतात त्यामुळेच कवितेच्या भावभावनेला  अर्थ प्राप्त होतो. कविता वाचनाची संहिता असते ती सादर करताना त्या कागदावर चिन्हाद्वारे लिहावे, जेणेकरून वाक्यांमध्ये कुठे चढ-उतार असायला हवा हे कविता वाचणाऱ्याला कळते. शक्यतो जाणकासमोर कविता वाचावी ते त्रुटी सांगतात. काही मंडळी ही आखून दिलेल्या नियमाच्या बाहेर जातात. आता पुन्हा एकदा काव्य लेखन आणि काव्य सादरीकरणाचे शिबिर टॅगने घ्यायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: if the poem is not felt by us it cannot be conveyed properly to others said dr vinod ingalhalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे