पुन्हा लॉकडाऊन झाल्यास लघुउद्योग कोलमडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:17+5:302021-02-23T05:00:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. परंतु, तसे झाल्यास ठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. परंतु, तसे झाल्यास ठाणे जिल्ह्यातील लघुउद्योग पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र आहे. पुन्हा लॉकडाऊन नकोच असेच म्हणणे या उद्योगांनी कथन केले आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, अन्यथा सर्वांनाच त्याचे भोग भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. कोरोना नंतर आता कुठे उद्योगधंदे सावरण्याच्या तयारीत आले आहेत. परंतु, पुन्हा जर लॉकडाऊन झाला तर ते न परवडणारे असेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
नागरिकांकडून होत असलेल्या चुकांमुळे पुन्हा कोरोना वाढताना दिसत आहे. आधी घेतलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पन्नाची साधनेही तोकडी झाली आहेत. अशात आता पुन्हा तो घेतला गेला तर उद्योगांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. वागळे इस्टेट भागात आशिया खंडातील सर्वांत मोठी उद्योग संस्था येथे होती. परंतु, आता हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढे उद्योग येथे कसेबसे तग धरून आहेत. त्यात मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनचा फटका या उद्योगांना बसलेला आहे. उद्योगधंदे बंद असतांनाही कामगारांचे पगार, भरमसाठ वीजबिल, पाणीबिल या उद्योगांनी आता कुठे भरले आहे. त्यातून आता कुठे ते सावरण्याच्या तयारीत आले आहेत. परंतु पुन्हा लॉकडाऊन घेतला तर ते परवडणारे नसल्याचे येथील उद्योजक सांगत आहेत. ठाण्यात तीन हजारांच्या आसपास उद्योगधंदे शिल्लक राहिलेले आहेत. त्यात आता कुठे येथे कामगार पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. परंतु, लॉकडाऊन झाल्यास कामगार परत जातील, अशी भीती तर आहेच, शिवाय मार्चअखेर जवळ येत असल्याने सर्वच गणित कोलमडून पडणार आहे. जीएसटी रिटर्न असेल किंवा इतर रिटर्न भरण्यासाठीदेखील वेळ मिळणार नाही. याशिवाय जे काही ग्राहक किंवा इतर कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. तेदेखील पाठ फिरवतील अन् त्यातून खूप मोठे नुकसान उद्योगांना सहन करावे लागणार आहे.
.......
कोरोनाचे रुग्ण-६१,१२६
बरे झालेले रुग्ण-५८,५२९
कोरोना बळी-१,३८०
धोका वाढतोय
मागील दीड ते दोन महिने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ठाण्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढवत आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांसारखीच ठाण्याचीही परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. ठाण्यात रुग्णांची संख्या पुन्हा दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पुन्हा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनासेंटर सज्ज केले आहेत. शहराच्या अनेक भागांत आजही मार्केट परिसरातही गर्दी दिसत आहे. मास्क न घालता वावरणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यामुळेच हा धोका आणखी वाढला आहे.
आठवडाभरात वाढली रुग्णांची संख्या
मागील दीड ते दोन महिने रुग्णवाढीचा दर सारखा होता. ८० ते १०० च्या आतमध्ये रुग्ण आढळत होते. परंतु, गेल्या सात दिवसांत रुग्णवाढ अधिक होताना दिसत आहे. आता दिवसाला १०० ते १७५ पर्यंत ते आढळत आहेत. सात दिवसांपूर्वी रुग्णवाढ ही २.१० टक्के एवढा होती. ती आता वाढून ५.१२ टक्क्यांवर आली आहे.
......
सर्व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने योग्य निर्णय घेतला आहे की मास्क लावा ,अंतर राखा आणि पुन्हा लॉकडाऊन टाळा. परंतु, मूठभर न ऐकणाऱ्या लोकांमुळे लॉकडाऊन न करता मास्क न लावणाऱ्याविरुद्ध थोडे कडक निर्बंध घाला. कारण लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. आता कुठे उद्योग आपले डोके वर काढत आहेत. मार्च अखेरचे कामाचे प्रेशर आहे. ऑर्डर रद्द होऊ शकतात.
- सुजाता सोपारकर, वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन
.....
आता कुठे उद्योग व्यवसाय वेग घेत आहेत. कामगार नुकतेच कामावर परत येत आहेत.आता बंद करणे म्हणजे उद्योगासमोर मोठे आव्हान आहे. उद्योगांचे प्रचंड नुकसान होईल हा एक भाग पण ग्राहक नाखूष होतील ऑर्डर जातील त्याचे काय. मार्चअखेर कामाचे प्रेशर आहेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक शासकीय कामे/रिटर्न्स भरणे थांबतील, त्यापेक्षा मास्क न लावणाऱ्यावर कडक निर्बंध घाला.
- संदीप पारिख, वरिष्ठ उपाध्यक्ष, कोसिआ
-----------
आधीच्या लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या व्यापाऱ्यांची गाडी आता कुठे रुळावर येत आहे. शासनाने योग्य निर्णय घेतला आहे की मास्क लावा, अंतर ठेवा व लॉकडाऊन टाळा. पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही त्यापेक्षा कडक निर्बंध लावा, मास्क न लावणाऱ्यावर कारवाई करा.
- भावेश मारू, मानद सचिव, ठाणे व्यापारोद्योग महासंघ
-------