तीन दिवस पाणी नसेल तर कसं जगायचं

By admin | Published: December 8, 2015 12:29 AM2015-12-08T00:29:53+5:302015-12-08T00:29:53+5:30

आजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता

If there is no water for three days, then how to live? | तीन दिवस पाणी नसेल तर कसं जगायचं

तीन दिवस पाणी नसेल तर कसं जगायचं

Next

मुरलीधर भवार,  डोंबिवली
आजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता. आता तो आणखी बिकट होत गेला. आठवड्यातून तीन-तीन दिवस पाणी नसेल, तर सांगा कसं जगायचं... डोळ््यांत पाणी आणून मनातली धगधग व्यक्त करत महिला विचारत होत्या. उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वीच दोघांचे जीव गेले आहेत. येत्या सहा-सात महिन्यांत आणखी काय भोगायला लागणार आहे, असा संतप्त प्रश्नही त्यांनी लोकमतच्या माध्यमातून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विचारला.
निवडणुकीपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरात आठवड्यात तीन दिवस पाणी येत नाही. उरलेले चार दिवस कमी दाबाने येते. श्रीसमर्थ कृपा चाळीत राहणाऱ्या प्रमिला अंजारा यांच्या घरी शनिवारी पाणी आले नव्हते. नेव्हीच्या रुग्णालयात कामाला असल्याने त्यांना रविवारी सुटी होती. कपडे धुण्यासाठी त्या नजीकच्या खदाणीवर गेल्या होत्या. त्या वेळी सोबत १८ वर्षांचा मुलगा निखिलही होता. आई कपडे धुताना पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तोही पाण्यात उतरला. पण पोहता येत नसल्याने तो आणि आई दोघेही बुडाले. त्यांच्या मृत्यूला जशी परिसरातील पाणीटंचाई जबाबदार आहे, तसेच त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत, असा आरोप परिसरातील महिलांनी केला. प्रमिला यांच्या शेजारणीने सांगितले, शनिवारी पाणी न आल्याने त्या प्रथमच खदाणीवर गेल्या. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत पाणी येते, तेदेखील कमी दाबाने. त्यामुळे खूप हाल होतात.
या परिसरात राहणाऱ्या कविता जाधव म्हणाल्या, गेल्या महिनाभरात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग तीन दिवस पाणी येत नाही. त्यामुळे हाल होतात. यापूर्वी आम्ही दुुसऱ्या चाळीत राहत होतो. ती जागा आम्ही विकली. दुसरीकडे भाड्याने राहण्यासाठी गेलो. जागा बदलली पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. माय-लेकांचा जीव गेल्याची घटना ऐकून आमच्यावरही अशीच वेळ येते का, अशी भीती आम्हाला सतावू लागली आहे.
ज्येष्ठ महिला मनकर नायंगले यांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी आम्ही या परिसरात साडेचार लाख रुपये मोजून घर घेतले. घर विकताना चाळमालकाने आम्हाला पाणी चांगल्या प्रकारे येते असे भासविले. घर घेतल्यानंतर काही महिन्यांत पाण्याचा त्रास समोर आला. पुन्हा दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्या वाहिनीवरून नळजोडणी घेतली. तरीदेखील पुरेसे पाणी येत नाही. ज्या खदाणीत मायलेकांचा मृत्यू झाला. त्या खदाणीच्या बाहेरच भोपर, देसलेपाडा ग्रामपंचायतीने बोर्ड लावला आहे... पाणी खोल असल्याने कपडे धुणे व पोहण्यास सक्त मनाई असल्याचा उल्लेख त्यावर आहे.
भोपर, देसलेपाडा आता महापालिका हद्दीत आहे. पालिकेतर्फे तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. खदाणीतील पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते. तसेच जवळच्या वीटभट्टीवर विटा तयार करण्यासाठीही त्याचा वापर होतो.
ज्येष्ठ नागरिक महादेव देसले यांनी सांगितले. अनेक जण या खदाणीत बुडाले आहेत. त्याचा नेमका आकडा त्यांना सांगता आला नाही. काही वर्षांपूवी खदाणीभोवती तारेचे कुंपण घातले होते. ते पुढे काही लोकांनी काढून फेकून दिले.

Web Title: If there is no water for three days, then how to live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.