चाचणी न करताच उपचार केल्यास डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:32+5:302021-04-24T04:41:32+5:30
कल्याण : एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याला अँटिजन टेस्ट करण्याचा सल्ला न देता, काही डॉक्टर त्याच्यावर उपचार ...
कल्याण : एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याला अँटिजन टेस्ट करण्याचा सल्ला न देता, काही डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. मात्र, प्रकृती बिघडल्यावर त्याला कोरोना रुग्णालयात पाठवितात. अशा डॉक्टरांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही संकल्पना कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अवलंबिली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही महापालिकेच्या हद्दीतील एक हजार फॅमिली डॉक्टरांच्या मदतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. मात्र, काही एमबीबीएस, बीएएमएस, एमडी डॉक्टर आणि लहान क्लिनिक्स चालविणाऱ्या डॉक्टरांकडे काही रुग्ण जातात. त्याला कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास त्याला डॉक्टरांनी प्रथम अँटिजन टेस्ट करण्याचा सल्ला दिला पाहिजे. मात्र, महापालिका हद्दीतील काही डॉक्टर आजही रुग्णाला अँटिजन टेस्टचा सल्ला देत नाहीत. त्याला ताप, थंडी, सर्दी खोकल्याची औषधे देऊन उपचार सुरू ठेवतात. त्याला श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्यानंतर कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देतात. तोपर्यंत कोरोनाने रुग्णाच्या शरीरात गंभीर स्वरूप धारण केलेले असते. त्यामुळे त्याची टेस्ट होऊन रिपोर्ट येईपर्यंत रुग्ण ऑक्सिजन बेड अथवा व्हेटिंलेटरवर पोहोचलेला असतो. त्यामुळे रुग्णाची गंभीर स्थिती होते. कारण त्याचे निदान उशिरा झालेले असते. अनेकदा अशा प्रकारचा रुग्ण उशिरा निदान झाल्याने दगावतो. याला तो डॉक्टर जबाबदार असतो, जो त्याला कोरोनाची टेस्ट तातडीने करण्यास सांगत नाही, अशी व्यथा रुग्णांच्या नातेवाइकांसह काही रुग्णांनीही मांडली आहे. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. महापालिकेच्या फॅमिली डॉक्टर कोविड फायटर या मोहिमेंतर्गत दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १ हजार डॉक्टर जोडून घेण्यात आले आहे, अन्य डॉक्टरांनी त्याच धर्तीवर काम करावे. रुग्णांनीही लक्षणे आढळल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरूपाची आहे. तिच्यापासून वाचण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनी सतर्क राहण्याची गरजही आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
----------------