झाडे तोडल्यास गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:31 AM2018-02-23T02:31:28+5:302018-02-23T02:31:31+5:30
होळीच्या निमीत्ताने मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी पालिकेने पावले उचलण्याचे ठरवले आहे. वृक्षतोड केल्याचे आढळल्यास तोडणारे व जमीन मालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत
मीरा रोड : होळीच्या निमीत्ताने मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी पालिकेने पावले उचलण्याचे ठरवले आहे. वृक्षतोड केल्याचे आढळल्यास तोडणारे व जमीन मालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पर्यावरणाचे महत्व पाहता वृक्षांचा बळी घेऊ नका, त्यांचे संरक्षण करा अशी जनजागृती करत शालेय विद्यार्थ्यांनी गुुरुवारी पालिका उपायुक्तांना निवेदन दिले.
होळीसाठी जांभूळ, आंबा, भेंडी, सुपारी सह खारफुटीची देखील सर्रास कत्तल केली जाते व त्याच्या होळ्या उभारल्या जातात. शिवाय होळ्या जाळण्यासाठीही मोठ्या प्रमाणात लाकडे वापरली जातात. यातून लहान मोठ्या वृक्षांचा बळी जाऊन पर्यावरणाचा ºहास होतो. शिवाय त्यावर अवलंबून असणारे पक्षी, प्राण्यांचे निवारेही नष्ट होतात.
झाडांची कत्तल रोखण्यासाठी सेंट विन्सेंट दि पॉल शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती चालवली आहे. शाळेच्या संचालिका ममता मोराईस व निकसन मोराईस यांनी देखील विद्यार्थ्यांसोबत पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नागेश इरकर यांची भेट घेतली.