वाहने न नेल्यास होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:07+5:302021-03-20T04:40:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील बेवारस व भंगार वाहनांवर केडीएमसी आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील बेवारस व भंगार वाहनांवर केडीएमसी आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत जप्त केलेली २२ वाहने सध्या केडीएमसीच्या खंबाळपाडा येथील कचरा डेपोनजीकच्या जागेत ठेवली आहेत. त्यापैकी सहा वाहनांची ओळख पटवून वाहन मालकाने ती नेली आहेत. मात्र, उर्वरित १६ वाहनांचा प्रश्न राहिला असून, संबंधितांनी वाहतूक पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आणि ती घेऊन जावीत, अन्यथा ही वाहने बेवारस म्हणून त्यांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
यासंदर्भात डोंबिवलीतील सहायक वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश्री शिंदे म्हणाल्या की, रस्त्यात उभी केलेली भंगार व बेवारस वाहने हटवावीत, अन्यथा त्यावर कारवाई केली जाईल, अशी इशारा देणारी नोटीस वाहनांवर लावली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही संबंधित वाहनमालकांनी न केल्याने केडीएमसी व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत नऊ दुचाकी, एक तीनचाकी व सहा चारचाकी अशी २२ वाहने जप्त केली होती. त्यातील सहा वाहने संबंधितांनी नेली आहेत. उर्वरित वाहने संबंधितांनी संपर्क साधून, ओळख पटवून व दंड भरून घेऊन जावीत.
दरम्यान, दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले वाहन न नेल्यास शासन नियमानुसार त्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे वाहतूक विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
-----------