आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील
By जितेंद्र कालेकर | Published: November 21, 2023 06:28 PM2023-11-21T18:28:14+5:302023-11-21T18:30:17+5:30
"आम्ही शांततेतेचे आव्हान करतोय, तर आमच्यावरच गुन्हे दाखल करताय..."
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा कार्यकर्ते हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज आपली सर्व कामे सोडून येत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करीत आहे. तरीही आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आता आम्ही घाबरणार नाही. ३२ लाख मराठयांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता २४ डिसेंबरपर्यंत मराठयांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत मंगळवारी केली.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जरांंगे पाटील यांची मंगळवारी दुपारी सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. तत्पूर्वी, सभेमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. ठाण्यात आलाे तरी आपण काही घाबरत नाही. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. त्यांनी आरक्षण दिले तर समाज बांधव त्यांना डोक्यावर घेउन नाचतील. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळे विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा योगायोगाने ७ ते २२ डिसेंबर या काळात विधानसभेचे अधिवेशन आहे. सरकारने आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच. आता मराठा कुणबी नोंदीचा दुसरा अहवाल स्वीकारुन २२ ते २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा २५ डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ते आंदोलन सरकारला झेपणारे नसेल. त्याचवेळी समाजानंही एकजुट ठेवावी. मराठे हटणार नाहीत. आरक्षणाशिवाय, एक इंचही माघार घेणार नाही. जीव गेला तरी ही माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. हे आंदोलन मराठयांच्या न्यायासाठी असून सरकारच्या समन्वयासाठी नाही. पद, पैसा आणि खूर्चीचा मोह आपल्याला नाही. मराठा समाजासाठी इंच भरही नियत ढळू दिली जाणार नाही. आरक्षण देऊन मराठयांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पहायचा आहे. त्यामुळे कोणीही गट तोडू नका, राजकारण करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी आपल्या समाजबांधवांना दिला.
दरम्यान, गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, छगन भुजबळांचे विचार तसेच म्हणुन ते असेच वक्तव्य करीत आहेत. त्यांचा बोलवतां धनी कोणी नाही, असं वाटत होतं पण एवढं बोलून त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे आता शंका येते त्यांच्या पाठिशी कोणी आहे का? आम्ही कधी बोललो का ओबीसींना आरक्षण का दिले. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन आम्ही त्यांना विरोध केला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षण पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.