शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:40+5:302021-07-28T04:41:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : छायाचित्रण, चित्रीकरण यांचे आकर्षण आजही कायम आहे. प्री-वेडिंग, लग्नसराईसह विशेष पर्यटन स्थळ येथील फोटो ...

If you are going to use a drone for shooting, beware! | शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : छायाचित्रण, चित्रीकरण यांचे आकर्षण आजही कायम आहे. प्री-वेडिंग, लग्नसराईसह विशेष पर्यटन स्थळ येथील फोटो कॅमेऱ्यातून टिपण्याचे काम छायाचित्रकारांकडून सुरू असताना यात आता उंचीवरून छबी टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होत आहे; परंतु आता तुम्ही ड्रोन वापरणार असाल, तर सावधान. गेल्या काही महिन्यांत लष्करी तळांवर पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना आढळून आल्याने ड्रोन उड्डाणांबाबत नियमावली कठोर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यासाठी दंडात्मक तरतूदही केली आहे.

ड्रोन म्हणजे पायलटविरहित छोटेखानी विमान. मुळात ड्रोन्सचा वापर हा लष्करी मोहिमांसाठी केला जातो; परंतु ड्रोनला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असून, त्याचा वापर नागरी क्षेत्रातही होऊ लागला आहे. सध्या ड्रोन कॅमेरा हे लोकप्रिय व्हर्जन झाले आहे. वायरलेस रिमोट कंट्रोलचा वापर करीत भोवऱ्याप्रमाणे आकाशात भिरभिरणारा हा कॅमेरा लग्नापासून ते सिनेमापर्यंत सगळ्या सत्कार समारंभांमध्ये हमखास वापरला जातो. एखाद्या दृश्याचे उंचीवरून छायाचित्रण किंवा चलचित्रण करायचे असेल तर ड्रोनचा वापर केला जातो. त्यातून टिपल्या जाणाऱ्या व्हिडिओचा दर्जाही चांगला असतो; परंतु काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेवरून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन विक्री आणि उडविण्याबाबत नियम आखून दिले आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार ड्रोनबाबत स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. ड्रोन उडविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करावा लागतो. संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी आणि किती कालावधीसाठी ड्रोन उडविण्यात येणार आहे, याची माहिती पोलिसांना द्यावी लागते. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून परवानगीबाबत निर्णय घेतला जातो.

---------------------

ड्रोन वापरण्याचे नियम

- प्रतिबंधित भागांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविता येत नाही. कोणत्याही नागरी, खासगी किंवा संरक्षण विमानतळांचा तीन कि.मी. परिसर, आंतरराष्ट्रीय सीमेपासूनच्या २५ कि.मी. अंतरावर ड्रोन उडविता येत नाही.

- २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनसाठी परवान्याची आवश्यकता नसते. व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी यूएएस ऑपरेटर परमिट-१ आय हा परवाना आवश्यक आहे.

- वजनदार वस्तू किंवा ड्रोनद्वारे डिलिव्हरीसाठी २५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनला यूएएस ऑपरेटर परमिट -२ हा परवाना लागतो. डीजीसीए आणि हवाई संरक्षण नियंत्रकांकडून पूर्वपरवानगी आवश्यक असते.

- लहान ड्रोन १२० मीटर उंची आणि २५ मीटर प्रतिसेकंदापेक्षा अधिक वेगवान उडविता येत नाही. डीजीएसच्या परवान्यामध्ये नमूद अटीनुसार मध्यम किंवा मोठ्या आकाराचे ड्रोन उड्डाण करू शकतात.

-----------------------------------

ड्रोन उडविण्यासाठी लायसन्स हवे

- ड्रोन उडविण्यासाठी लायसन्स बंधनकारक आहे.

- ड्रोन उडविणारी व्यक्ती १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी

- प्रशिक्षण आणि रिमोट पायलट परवान्यांसाठी अर्ज करण्याचे किमान वय १८, तर कमाल वय ६५ वर्षे आहे.

-----------------------------------

एका शूटिंगचा खर्च येतो १० हजार

लग्न किंवा प्री-वेडिंग शूटिंगसाठी दिवसाला १० हजार रुपये ड्रोनचे भाडे आकारले जाते. शूटिंग जास्त वेळ चालले तर हा खर्च ३० ते ५० हजारांपर्यंतही जातो. चित्रपट किंवा मालिकांसाठी ड्रोनचे भाडे त्याहून अधिक असते.

------------------------------------

अशावेळी परवानग्यांचा बाऊ नको

चित्रपट आणि मालिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनसाठी परवानगी लागत असेल तर ठीक आहे; परंतु लग्नसराई किंवा घरगुती समारंभ अशा कार्यक्रमांमध्ये ड्रोन वापरासाठी परवानगी घ्यावी लागते हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये कायद्याचे उल्लंघन होत नाही. हौसेखातर ड्रोन वापरण्याची एक प्रथा लग्न आणि अन्य छोट्या कार्यक्रमांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा ठिकाणी परवानग्यांचा बाऊ करू नये, असे वाटते.

- विवेक भणगे अध्यक्ष, डोंबिवली फोटोग्राफी सोसायटी

--------------------------------------

Web Title: If you are going to use a drone for shooting, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.