रस्त्यावर उतरलात तर काम दिसेल; राष्ट्रवादीच्या आरोपावर शिवसेनेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:57 PM2020-07-08T16:57:39+5:302020-07-08T16:58:52+5:30
ठाण्यात महाविकास आघाडीत आणखी एक ठिणगी पडली असून महापौरांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना टोला लगावला आहे.
ठाणे : एकीकडे कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्याला विचारत घेत नसल्याचा आरोप केला असतांनाच आता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणुक करत असून आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरावे असे विधान केले आहे. परंतु परांजपे यांच्या या विधानाचा महापौर नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: करोनाचा उद्भव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोव्हिड रु ग्णालयांमध्ये जाऊन रु ग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणवणाऱ्या व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टिका म्हस्के यांनी बुधवारी येथे केली.
मागील आठवडय़ात कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी ठाण्यातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी विचारात घेत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत विस्तव पडल्याचे दिसून आले. हा विस्तव शांत होत नाही तोच, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठाणे महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. परंतु पालकमंत्री देखील थेट रस्त्यावर उतरत नसून प्रशासनावर विसंबून असल्याची टिका केली आहे. त्यांनी केलेल्या या टिकेनंतर महाविकास आघाडीत ठाण्यात विझत आलेला विस्तव पुन्हा एकदा पेटला आहे. महापौरांनी परांजपे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. शिंदे यांनी वारंवार आढावा बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देण्याबरोबरच प्रत्यक्ष क्वारंटाइन सेंटर आणि कोवीड रु ग्णालयांना भेटी देऊन तेथील समस्या वेळोवेळी दूर केल्या. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे पालकमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली अवघ्या 12 दिवसांत 1024 बेड्सचे अद्ययावत कोवीड रु ग्णालय देखील उभे राहिले.
लॉकडाउनच्या काळात गरजूंना घरोघरी धान्यवाटप करण्यापासून मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची विनामूल्य व्यवस्था करण्यापर्यंत पालकमंत्नी यांनी प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन, रस्त्यावर उतरूनच काम केले आहे. परंतु, करोनाचा उद्भव झालेल्या दिवसापासून घरात दडी मारून बसलेल्यांना बाहेर काय चाललंय, याची कशी कल्पना असणार, असा टोलाही म्हस्के यांनी लगावला. त्यांच्या पक्षाचे 8क् वर्षांचे प्रमुख प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, करोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातले अनेक मंत्री व नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले; परंतु तरु ण नेतृत्व म्हणवणाऱ्या ठाण्यातल्या नेत्यांचे नखही ठाणोकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
एकूणच राज्यात महाविकास आघाडीत मागील काही दिवसापासून सुरु असलेली खलबते यावरुन भाजप चांगलेच तोंड सुख घेत आहे. राज्याचे सरकार महाविकास आघाडीतील अंतर्गत वादातूनच पडेल अशा टिकाही भाजपकडून केली जात आहे. असे असतांना याची सारवासारव करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरीष्ठ मंडळी प्रयत्न करीत असतांना आता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे.