झेपत नसेल तर सत्ता सोडा
By Admin | Published: July 16, 2017 02:55 AM2017-07-16T02:55:32+5:302017-07-16T02:55:32+5:30
शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील मुजोर रिक्षावाल्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. फेरीवाल्यांविरोधात मानवी साखळी नागरिकांनीच करायची. प्रदूषणाचा त्रास झाल्यास त्यासाठीही नागरिकांनीच आवाज उठवायचा. सगळे जर नागरिकांनीच करायचे, तर मग सत्ताधाऱ्यांचा उपयोग काय? महापौर, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांनी काय, फक्त मोजायचे? २२ वर्षे करता काय मग? सत्ता झेपत नाही सांगा आणि सोडून द्या ना, असा टोला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘फेरीवाल्यांविरुद्ध आता मानवी साखळी’ या शीर्षकाखाली शनिवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कदम यांनी घेतली. शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना लक्ष्य करत त्यांनी वरील टोला लगावला. फेरीवाल्यांविरोधात उपोषणास्त्र शिवसेनेने काढले होते. त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाने पत्रकार परिषद घेत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणार, असा गाजावाजा केला होता. या प्रश्नावर केडीएमसीची महासभाही तहकूब केली होती. पण, तरीही फेरीवाला प्रश्न ‘जैसे थे’ आहे. म्हणजेच, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही, हे स्पष्ट झाले. प्रशासनावरील त्यांची पकड ढिली होत आहे. त्यामुळेच समस्या वाढत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.
मुजोर रिक्षाचालकांविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना काहीच करत नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटो’ असा मंच स्थापन केला. पण, सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यासाठी नागरिकांनाच का रस्त्यावर उतरायला लागत आहे, याकडे कदम यांनी लक्ष वेधले.
एमआयडीसी परिसरात रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे. कंपन्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडत आहेत. तसेच वायूप्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. त्यातही सत्ताधारी कमी पडत आहेत. गुन्हेगारीमध्येही सांस्कृतिक उपराजधानी आघाडीवर आहे. वरिष्ठ पोलिसांच्या बदलीसाठी प्रयत्न करणारे सत्ताधारी शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रयत्न का करत नाहीत. त्यासाठीही आता नागरिकांमधूनच त्यांना अपेक्षा आहे का, असा सवाल कदम यांनी केला.
अस्वच्छता, बेधुंदपणा, मनमानी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खेळण्यासाठी मैदाने नाहीत. ज्येष्ठांना विरंगुळा नाही. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. फेरीवाला, वाहतूककोंडी, पाणीसमस्या, कचरा, खंडित होणारा वीजपुरवठा अशा सर्वच समस्या शहरात आहेत. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. २२ वर्षे सत्ता देऊनही सोयीसुविधा मागाव्या का लागतात, अशी टीका कदम यांनी केली.
प्रदेश उपाध्यक्षांना केवळ केडीएमसीतच रस
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधी पक्षात आहे. मात्र, त्यांचे अस्तित्वच असून नसल्यासारखे आहे. राजेश कदम हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, पण तरीही ते या महापालिकेभोवतीच लक्ष का घालतात? याचाच अर्थ त्यांचा येथील विरोधीपदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्याच पक्षात फाटाफूट, गटबाजी आहे. त्यांनी आम्हा सत्ताधाऱ्यांबाबत बोलणे म्हणजे ‘स्वत:चे ठेवावे झाकून अन्...’ असे झाल्याची टीका भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.