झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:11 AM2017-08-02T02:11:55+5:302017-08-02T02:11:55+5:30

केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचे झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे

Ignore the breaking of trees | झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

Next

कल्याण : केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचे झाडे तोडण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी केला आहे. या संदर्भात हळबे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. जाधव यांच्याकडे कोणत्याही एका विभागाचा पूर्णवेळ कार्यभार सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई, ठाणे परिसरात धोकादायक झाडे कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. मात्र, केडीएमसीही हद्दीतही धोकादायक अवस्थेत झाडे आहेत. त्याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे. अशी झाडे तसेच वाढलेली झाडे छाटणी करणे, यासंदर्भात मागील चार-पाच महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे हळबे यांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या परवानगी पत्रांकडेही दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभारी म्हणून सचिव जाधव हे महापालिकेत उद्यान अधीक्षक म्हणून मूळ पदावर कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे सचिवपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने त्यांना उद्यान विभागाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. मुंबई, ठाण्यासारखी एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?, असा सवालही हळबे यांनी केला आहे. एकतर जाधव यांच्याकडून उद्यान अधीक्षकाचा पदभार काढून घेत त्यांना सचिवपदाचा कायमस्वरूपी कारभार सोपवावा, अन्यथा अन्य कोणालातरी पूर्णवेळ उद्यान अधीक्षकाची जबाबदारी सोपवावी, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.
या संदर्भात हळबे यांनी केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाला मंगळवारी पत्र दिले असून, यावर कोणता निर्णय घेतला जातो? याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ignore the breaking of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.