आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष : ठाण्यातील १३ हॉटेल्स पालिकेने केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:08 PM2018-03-04T20:08:09+5:302018-03-04T20:08:09+5:30
आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणा-या ८६ पैकी १३ हॉटेल सील करण्याची कारवाई ठाण्याच्या अग्निशमन दलाने रविवारी ठाणे शहरात केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
ठाणे: गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार नोटीसा देऊनही आपल्या हाटेलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना न करणा-या ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणा-या अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
आग प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अग्निशमन दलाने ठाणे शहरातील ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना ‘ना हरकत दाखला’ दिलेला नाही. त्यामुळ त्यांना सप्टेंबर २०१७ पासून फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ठाणे अग्निशमन दलाच्या वतीने त्यांची पूर्तता करण्यासाठी वारंवार नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० हॉटेल मालकांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करुन हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला. जी हॉटेल अधिकृत इमारतीमध्ये नाहीत परंतू, त्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांची पूर्तता केली आहे, अशी २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये असूनही ज्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशा ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांमध्ये सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या आदेशानंतर २४ तासांच्या आतच मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या पथकाने रविवारी हॉटेल टायटॅनिक(कळवा), हॉटेल एव्हरी डे अंडे (नौपाडा), हॉटेल म्युनो (कोठारी कंपाऊंड), हॉटेल ७० डिग्री (कोठारी कंपाऊंड), हॉटेल रेनबो बार (बाळकुम नाका), हॉटेल एक्स झोन (वाघबीळ), हॉटेल गोल्डन फास्ट फूड (कोपरी), हॉटेल लजीज फूड जंक्शन (कोपरी), हॉटेल हादिया, हॉटेल कौसर (कौसा-मुंब्रा), हॉटेल देवीदर्शन(रघुनाथनगर), हॉटेल फुकरे( फ्लॉवर व्हॅली) आदी १३ हॉटेल्स सील केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठी आता धावपळ केली जात आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराच्या वसूलीचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण न करणाºया सहायक आयुक्त तथा संबंधित परिमंडळातील उपायुक्तांवर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त जयस्वाल यांनी शनिवारच्या बैठकीत दिला होता. याच पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानेही ८६ हॉटेल्सवरील कारवाईचे गांभीर्य ओळखून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.