...पण गळतीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:10 AM2018-04-23T03:10:58+5:302018-04-23T03:10:58+5:30
या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.
कल्याण : पूर्वेकडील कोळसेवाडी चक्कीनाका भागातील चौकात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. परंतु, या जलवाहिनीला गळती लागल्याने येथे सर्वत्र पाणीचपाणी होऊन मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने सध्या येथे अपघातही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी वाहतूक पोलीस उपविभागाच्या वतीने महापालिकेकडे पत्रव्यवहार करून तातडीने गळक्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
पूर्वेकडील चक्कीनाका चौक परिसर हा कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली या शहरांकडून हाजीमलंग रोडकडे जाणारा आणि येणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठते आहे. शिवाय, या खड्ड्यांची खोली किती आहे, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघातही घडत आहेत.
एकीकडे शहरात पाणीकपात लागू असताना दुसरीकडे अशा गळतीच्या माध्यमातून होत असलेली पाण्याची नासाडी हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, कोळसेवाडी भागातील शहर वाहतूक उपशाखा विभागाचे एस.एन. जाधव यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.
अपघात घडल्यास जबाबदारी महापालिकेची
जलवाहिनीची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पार पाडावी, अन्यथा भविष्यात अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या व्हॉल्व्हचे लिकेज होऊन रस्त्यावर पाणी आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.