पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांकडे दुर्लक्ष
By admin | Published: August 3, 2015 01:13 AM2015-08-03T01:13:25+5:302015-08-03T01:13:25+5:30
गटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील
अनिकेत घमंडी , डोंबिवली
गटबाजीच्या राजकारणाने सर्वच पक्षांना पोखरले असून पक्षश्रेष्ठींच्या निवडप्रक्रियेला आणि निर्णयालाही फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवलीतील महत्वाच्या बहुतांशींनी एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत. या ठिकाणच्या आजी-माजी नगरसेवकांसह २५ जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना ९ जुलैदरम्यान दिले. जिल्हा नेतृत्वाकडून होणारी निर्णय प्रक्रिया मान्य नसल्याचे कारण सांगत त्यांनी हे राजीनामे दिल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे, परंतू त्याची दखलही वरिष्ठांनी घेतलेली नसल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
राजीनामे त्यांनी ९ जुलै रोजी तटकरेंना मुंबईत जाऊन दिले. आधी ते पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार होते, परंतू ते नसल्याने त्यांनी ते पत्र तटकरेंना भेटून देण्यासाठी तेथे गेले, मात्र तेही नसल्याने त्यांच्या कार्यालयात ते देण्यात आले. त्याची दखल घेत दोन दिवसात पवार बोलावतील अशी अपेक्षा पदाधिकारी कार्यकर्त्यांना होती, परंतू अद्याप ना फोन ना बैठक - भेटीचे निमंत्रण अशी अवस्था असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजीनामा दिलेल्यांमध्ये ६ विद्यमान नगरसेवक - नगरसेविका, माजी नगरसेवक, विद्यार्थी अध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ सभापती, सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, माजी महिला अध्यक्ष आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
लवकरच महापालिकेच्या निवडणूका होत आहेत, आधीच पक्षाने खासदारकी-आमदारकी ला सपाटून मार खाल्लेला असतांना आता नवनवे निर्णय का लदाण्यात येत आहेत, बदल करण्यासही हरकत नाही, परंतू ते निर्णय घेतांना लोकल बॉडीला विचारात का घेतले जात नाही. जे निर्णय घ्यायचे आहेत ते निवडणुकीनंतर घ्यावेत. सध्या कोणतेही बदल करू नयेत. अन्यथा आम्ही राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहोत असा त्यांचा पवित्रा आहे.