संविधान दिनी घटनाकारांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 03:48 PM2020-11-26T15:48:53+5:302020-11-26T15:49:11+5:30
26 नोव्हेंबर रोजी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द केले होते.
ठाणे - संविधान दिनीदेखील संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची साफसफाई करुन पुष्पहार घालण्यासाठी वाहनाची व्यवस्था ठामपाने केली नाही, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
26 नोव्हेंबर रोजी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द केले होते. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. हा दिवस साजरा करण्याच्या मागणीसाठी 24 नोव्हेंबर रोजी ठामपा मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले होते. त्यानंतर ठाणे पालिकेने नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, ठाणे शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही पुतळ्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले की, ठामपा मुख्यालयात साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाला एकही पदाधिकारी उपस्थित राहिलेला नाही. तसेच, ठाणे शहरातील दोन्ही पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. या पुतळ्यांना संविधानप्रेमींकडून पुष्पहार अर्पण करण्यात येत असतो. त्यासाठी अग्नीशमन दलाचे वाहन ठामपाने उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र, ती व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. ठामपाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले असल्यानेच ठाणे रेल्वे स्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले.