टीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने नाटकांना आर्थिक फटका

By admin | Published: November 27, 2015 02:09 AM2015-11-27T02:09:10+5:302015-11-27T02:09:10+5:30

टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत

Ignoring the TV has given financial loss to the plays | टीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने नाटकांना आर्थिक फटका

टीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने नाटकांना आर्थिक फटका

Next

ठाणे : टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत. उलटपक्षी, नाटकांनी टीव्ही माध्यमाचा आपल्या विकासासाठी फायदा करून घ्यायला हवा होता. त्यांनी तो न केल्यामुळेच नाटकांना आर्थिक फटका बसला, अशी भावना टीव्हीशी संबंधित जाणकरांनी व्यक्त केली.
अनेक सकस व दर्जेदार टीव्ही मालिकांच्या निर्मितीशी निकटचा संबंध राहिलेले नितीन वैद्य म्हणाले की, मालिकांमुळे नाटकांचे अर्थकारण बिघडलेले नाही. मराठी चित्रपटाला अगोदर प्रेक्षक येत नव्हते, आता प्रेक्षक यायला लागलेत. मराठी चित्रपटांचे अर्थकारण सुधारले. त्याचे कारण मराठी चित्रपटाने टीव्ही माध्यमाचा आपल्या प्रमोशनकरिता वापर केला. त्याचप्रमाणे मराठी नाटकांनी टीव्ही माध्यमाचा योग्य वापर केला व प्रेक्षक आपल्याकडे वळवले तर आपोआप त्यांचेही अर्थकारण सुधारेल. आपल्याकडे सशक्त नाटकाची परंपरा आहे. रंगभूमी व साहित्य सशक्त आहे आणि त्याच्यातूनच टेलिव्हिजनचा हा व्याप उभा राहिला आहे. त्याचा फायदा नाटकाला झाला आहे. त्यामुळे नाटक आणि टेलिव्हिजन ही स्पर्धा नाही. उलट, मालिका आणि टेलिव्हिजनला आपले स्पर्धक किंवा मारक आहे असे न बघता ते माध्यम नाटकाला पूरक कसे करून घेता येईल, असा विचार केला पाहिजे.
माध्यमांवर ठपका ठेवणे योग्य नाही. टीव्हीवर नाटकांचे प्रोमेज दाखविले, कोणत्या भागांत कोणते प्रयोग होणार आहेत, ते दाखविले. तर प्रेक्षक टीव्हीचा प्रेक्षक नाटकांकडे येईल. गंगाराम गवाणकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाव आहे. आम्हाला नाटकांबद्दल प्रचंड आस्था आहे. माझी गवाणकरांवर कोणतीही टीका नाही, त्यांची नाराजी मी समजू शकतो. आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी या नव्या माध्यमाला नाटकासाठी पूरक कसे बनविता, येईल याचा विचार करायला हवा.
छोट्या पडद्यावरील आघाडीचे नाव असलेले उदय सबनीस म्हणाले की, मला व्यक्तिगत गवाणकरांचे मत मान्य नाही. मात्र गवाणकरांच्या मतावर माझी ही प्रतिक्रिया नाही. मराठी नाटकांचे अर्थकारण हे मुळातच कमी श्रेणीचे आहे. हिंदी, गुजराती नाटकांची तिकिटे दोन ते अडीच हजारांची असतात. आपल्याकडे ३०० रुपयांचे तिकीट केले तरी प्रेक्षकांचा विरोध असतो. जसे इतर खर्च वाढतात, तसे तिकिटाचे दर वाढायला हवे. त्यामुळे नाटकांचे अर्थकारण बिघडायला मालिका कारणीभूत आहे, असे वाटत नाही. मराठी प्रेक्षक सहजपणे एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन २०० रुपयांचे तिकीट काढतो आणि तिकडच्या खाद्यपदार्थांवर ३०० ते ५०० रुपये खर्च करू शकतो. तो मराठी नाटक चांगले पैसे देऊन का बघू शकत नाही. मुळात नाटक जर चांगले असेल, कलाकारांचा संच चांगला असेल, त्याची जाहिरात चांगली असेल तर नाटक चालायला हरकत नाही. टेलिव्हिजन आले तेव्हा याचा परिणाम मराठी चित्रपट, नाटकांवर होईल, अशी ओरड झाली. मात्र तसे झाले नाही. मालिका आणि नाटक हे वेगळे आहेत. अर्थकारण ही खूप वेगळी गोष्ट आहे. नाटक ही खूप वेगळी कला आहे, ती लाइव्ह परफॉर्म केली जाते. त्याचा वेगळा आनंद आहे. मल्टिप्लेक्सचा प्रेक्षक नाटकांकडे कसा वळेल, हे बघितले तर हा प्रश्न निर्माण होणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Ignoring the TV has given financial loss to the plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.