बेकायदा कमानी, जाहिरातफलकांना संरक्षण; मीरा-भाईंदर महापालिकेकडून नियमांची पायमल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:37 AM2019-09-10T00:37:52+5:302019-09-10T00:38:05+5:30
लोकप्रतिनिधींना आपल्याच ठरावाचा विसर
मीरा रोड : बॅनरमुक्त शहराच्या स्वत:च केलेल्या संकल्पनेला लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शहरात बेकायदा कमानी आणि बॅनरबाजीला ऊ त आला आहे. या बॅनरबाजीला महापालिकेचेच संरक्षण मिळत आहे. तर, रस्ते अडवून उभारलेल्या मंडपांना पालिका-पोलिसांकडून अभय मिळत असल्याने त्यावरही कोणतीच कारवाई केलेली नाही.
कमानी लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जनता दलाचे मिलन म्हात्रे यांनी कमानी व बेकायदा बॅनरविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती. कमानीमुळे रहदारी तसेच वाहतुकीला होणारा अडथळा हे बंदीचे एक प्रमुख कारण आहे. बेकायदा जाहिरातफलकही लावण्यास बंदी असून कायद्याने गुन्हा आहे. पोलीस उपअधीक्षक नोडल अधिकारी असल्यामुळे महापालिका जबाबदार आहे, तसेच पोलिसांचीही जबाबदारी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महासभेत ठराव करून बॅनरवर बंदी घालण्यात आली होती.
बॅनरमुक्त शहर म्हणून तेव्हा महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती आदींनी स्वत:चे कौतुक करवून घेतले होते. मात्र, शहरात बेकायदा बॅनर व कमानींना महापालिका, पोलीसच संरक्षण देत असल्याचे चित्र आहे.
शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आ. मेहता यांचे फलक झाडे तसेच अन्य ठिकाणी बेकायदा लावलेले आहेत. बॅनरसह कमानीही लागल्या असून त्यावर आ. मेहता, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मेहता आदी लोकप्रतिनिधींचे तसेच पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत आहेत. कृष्णा गुप्ता, प्रदीप जंगम आदींनी अनेक तक्रारी चालवल्या आहेत. आधीच रस्ते अडवून पालिका आणि पोलिसांच्या आशीर्वादाने मंडप उभारले आहेत.
आता शहरात सर्वत्र बेकायदा कमानी आणि बॅनरबाजी चालली असतानाही पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिक्रमण विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयुक्तांवरच कारवाईची मागणी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी केली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
भाईंदर धक्का बॅनरमुक्त; परिसर झाला स्वच्छ आणि सुंदर
शहरात सर्रास बेकायदेशीर बॅनरबाजी, कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यावर लोकप्रतिनिधींचे फोटो झळकत आहेत. महापालिकाही कारवाईस टाळटाळ करत आहे. त्याचबरोबर काही चांगले बदलही यंदा पाहायला मिळाले आहेत. भार्इंदर पश्चिमेतील धक्का येथे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेच्या ठिकाणी चमको लोकप्रतिनिधी सर्रास बॅनरबाजी करतात. त्यामुळे या परिसराचे विद्रूपीकरण सुरू होते. गतवर्षी यावर टीकेची झोड उठली तसेच तक्रारी झाल्या होत्या. यंदा लोकप्रतिनिधींनी येथील पालिकेच्या मंडप आदी ठिकाणी बॅनर लावलेले नाहीत. पालिका प्रशासनानेही येथे परखड भूमिका घेतली. हा परिसर बॅनरमुक्त आणि सुंदर दिसत आहे. हाच किस्सा इतर ठिकाणीही गिरवावा, अशी नागरिकांनी मत व्यक्त केले.
पालिकेच्या प्रभाग अधिकाºयांना बेकायदा कमानी, बॅनर काढून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पोलीस बीटमार्शलनाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत. एका ठिकाणची कमान, फलक पोलिसांनी काढले असून अन्य ठिकाणीही कारवाई केली जाईल. - शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदर विभाग