हायवेवरील ढाब्यांतच बेकायदा बार

By admin | Published: July 3, 2017 06:34 AM2017-07-03T06:34:34+5:302017-07-03T06:34:34+5:30

अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गालगतच्या ५०० मीटरच्या अंतरातील अनेक बार बंद झाले. रस्त्यांचा

Illegal bar on the highway | हायवेवरील ढाब्यांतच बेकायदा बार

हायवेवरील ढाब्यांतच बेकायदा बार

Next

- पंकज पाटील, अंबरनाथ
 
अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गालगतच्या ५०० मीटरच्या अंतरातील अनेक बार बंद झाले. रस्त्यांचा दर्जा बदलण्यासाठी दबाव आला. तोवर बेकायदा ढाबे चालवणाऱ्या मालकांनी पोलीस, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा दारूविक्री करत न्यायालयाचा निर्णयच गुंडाळून ठेवल्याचा आँखो देखा हाल...


र्वाेच्च न्यायालयाने अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामर्गापासून ५०० मीटरच्या अंतरातील सर्व बार आणि वाईन शॉपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काटई नाका ते कर्जत या राज्य महामार्गावरील अनेक बार आणि वाईन शॉप बंद झाले. मात्र याच राज्य महामार्गावरील बेकायदा ढाबे मात्र जोरात सुरू आहेत. दारूबंदी असतानाही येथील २५ ते ३० ढाब्यांवर सर्रास दारूपुरवठा सुरू आहे.
परवानाधारक बार बंद पडले आहेत तर दुसरीकडे कोणत्याही परवानग्या नसताना बेकायदा सुरू असलेल्या ढाब्यांवर स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाच्या ‘संरक्षणाखाली’ दारूचा महापूर सुरू आहे. या यंत्रणांच्या आशीर्वादाशिवाय हे ढाबे दारू पिण्याची परवानगी देऊच शकत नाही, हे तेथे प्रत्यक्ष फिरल्यानंतर, पाहणी केल्यानंतर दिसून आले. बारबंदीमुळे सरकारचा महसूल बुडाला असला, तरी ढाबे मालकांनी हप्ते बांधून पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उत्पन्नातील वाढ कायम ठेवली आहे. डोंबिवलीच्या काटई नाका ते अंबरनाथ आणि पुढे बदलापूर ते कर्जत हा राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर असलेले अनेक मोठे बार बंद करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर लागलीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यावरील सर्व बारमालकांचे परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे या सर्व बारमालकांनी आपल्या कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठवत हॉटेलमध्ये केवळ जेवण उपलब्ध करुन देण्यास सुरूवात केली. तसे बोर्ड लावले. मात्र दारू नसल्याने या हॉटेलमध्ये आता ग्राहक फिरकतच नाहीत. बारचेही हॉटेल झाल्याने ग्राहक देखील ज्या ठिकाणी दारू मिळते त्या ठिकाणीच गर्दी करू लागले आहेत. काटई ते कर्जत या रस्त्यावर सर्वच बार बंद पडल्याने आता हा रस्ता तसा तळीरामांसाठी सुनासुनाच होता. मात्र बेकायदा दारूविक्री सुरू होताच अवघ्या १५ दिवसात या रस्त्याचा ‘कायापालट’ झाला. या रस्त्यावर एकही बार सुरू नसला तरी त्याच रस्त्याला लागून असलेल्या प्रत्येक ढाब्यावर आता दारूची सोय करण्यात आली आहे.
या महामार्गावर असलेल्या बड्या बारची अवस्था दयनीय झालेली असताना याच हॉटेलला लागून असलेल्या ढाब्यांवर मात्र प्रचंड गर्दी होते. इतकी की प्रसंगी बयासला जागा नसते. प्रत्येक ढाब्यावर हवी तितकी दारू आणि तिही खुलेआम मिळत असल्याने गाड्या भरभरून ग्राहक तेथे येताना दिसतात. ढावा लहान असो किंवा मोठा ग्राहकांची सततची गर्दी तेथे पाहायला मिळते. बारमधील रात्रीचे ‘बसणे’ आता बेकायदा ढाब्यांमध्ये सुरू असल्याने तळीरामांनी हा रस्ता भरून गेलेला असतो.
बारवर बंदी आल्यावर ढाबे मालकांनी थेट पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा दारू विकण्याची आणि पिण्याची सोय करून घेतली आहे. बारमधील दारूच्या किंमतीपेक्षा ढाब्यावर मिळणाऱ्या दारूची किंमत कमी असत.
काटईपासून फिरतफिरत या ढाब्याची माहिती घेतल्यावर स्पष्ट होते की या रस्त्यावरील एकविरा, नाना, समाधान धाबा, मल्हार, २०-२० आदी ढाब्यांवर तळीरामांची खास सोय करण्यात आली आहे. नाना ढाबा हा एमआयडीसी जलवाहिनीच्या मागील बाजूला असल्याने या ढाब्याकडे सहजासहजी कुणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची मोठी गर्दी झालेली असते. तसाच प्रकार एकविरा ढाब्याच्या बाबतीत आहे. हा ढाबा देखील जलवाहिनीच्या मागच्या बाजूला असल्याने त्या ठिकाणीही ग्राहकांची ये-जा सुरू असते. अशीच स्थिती याच रस्त्यावरील सपना ढाब्याची आहे. या धाब्यावर देखील जेवण्यापेक्षा दारू पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अर्थात त्यांच्या या बेकायदा कामाला पोलिसांचे पुरेसे संरक्षण असल्यानेच ते उघडपणे हा व्यवसाय करीत आहेत. याच रस्त्यावर अश्विनी बार हाही गजबजलेला असे. मात्र बार बंद झाल्यावर तेथे पूर्वीसारखी गर्दी होत नाही. मात्र त्या पासून काही अंतरावर असलेल्या चड्डी ढाब्यावर पिणाऱ्यांची गर्दी होत आहे.
सर्वात भयंकर प्रकार हा अंबनाथ तालुक्यात घडत आहे. शहराच्या मध्यभागी असलेला फॉरेस्ट नाका ते एमआयडीसी रोड हा रस्ताही महामार्गात मोडत असल्याने या रस्त्यावर असलेला गोल्डन पंजाब या बारमध्ये दारू विकणे बंद झाले आहे. मात्र त्याला लागूनच असलेल्या ‘मैत्री कट्टा’ या ढाब्यावर मात्र कोणतीही परवानगी नसतानाही सर्रास दारू दिली जाते. या ढाब्यावर पूर्वी क्वचितच गर्दी दिसत होती. मात्र बारबंदीच्या निर्णयानंतर या ढाब्यात बसण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते, इतका तो ओसंडून वाहातो. या ठिकाणी होणारी गर्दी पाहून हॉटेल मालकाने मोठी शेड उभारून त्या ठिकाणी टेबल टाकून तळीरामांसाठी जादा जागा तयार केली आहे. भरवस्तीत असल्याने हा ढाबा सर्वांच्याच आवडीचा झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या ढाब्यावर दारू पिण्यात येते याची कल्पना पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्काला नसेल, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

ढाबामालकांना सुगीचे दिवस : दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत दारू पिण्यासाठी ढाब्यावर ग्राहक येत असतात. तर पुन्हा सायंकाळी ७पासून रात्री एकपर्यंत हे ढाबे तळीरामांनी भरलेले असतात. दारु पिण्यासाठी येणारे ग्राहक याच ठिकाणी जेवत असल्याने ढाब्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.

Web Title: Illegal bar on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.