आरक्षित जागेवर बांधल्या बेकायदा चाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:41 PM2019-12-26T23:41:28+5:302019-12-26T23:41:38+5:30
कारवाईची मागणी : वसार येथील महिलेने केली केडीएमसीकडे तक्रार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात खेळाचे मैदान व पोलीस ठाण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूमाफियांनी चाळी उभारल्या आहेत. या चाळी तोडण्याची मागणी अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील रहिवासी कुंदा मढवी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे महापालिका बेकायदा चाळी उभारणाऱ्यांविरोधात काय कारवाई करते, याकडे मढवी यांचे लक्ष लागले आहे.
मढवी यांनी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित जागेविषयी विचारणा केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने मढवी यांना लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘२७ गावे महापालिका हद्दीत २०१५ पासून समाविष्ट करण्यात आली आहेत. २७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकास योजना तयार करून त्यास सरकारची मंजुरी घेतली आहे. वसार गावातील आरक्षित जागेवर ज्या भूमाफियांनी चाळीचे बांधकाम केले आहे, ती जागा विकास योजनेच्या आराखड्यात खेळाचे मैदान व पोलीस ठाण्यासाठी आरक्षित आहे. आरक्षित जागेचे रक्षण करणे व त्यावर होत असलेल्या बेकायदा चाळी तोडण्याचे काम महापालिकेचे आहे.’ मात्र, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने मढवी यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून दाद मागितली आहे. मढवी यांच्या तक्रारीला अनुसरूनच जितीन साळुंके यांनीही विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, हा परिसर महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र ९ आयच्या अंतर्गत येतो. या प्रभागाचे प्रभाग अधिकारी एस.आर. रोकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात मढवी यांचा तक्रार अर्ज प्रभाग कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्याची शहानिशा करून संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.