बल्याणी गावातील बेकायदा चाळीवर महापालिकेचा हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:37 PM2018-02-03T16:37:09+5:302018-02-03T16:56:51+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व प्रभागातील बेकायदा बांधकामे पाडण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व प्रभागातील बेकायदा बांधकामे पाडण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विविध प्रभागात बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई सुरु आहे. आज महापालिकेच्या बेकायदा बांधकाम विरोधी पथकाने अ प्रभागातील बल्याणी गावातील बेकायदा बांधकामावर हातोडा चालविला.
प्रभाग अधिकारी किशोर खुताडे यांनी माहिती दिली की, शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बेकायदा बांधकाम विरोधी कार्यक्रम हाती घेतला होता. या मोहिमेअंतर्गत आज शनिवारी दिवसभरात 25 खोल्या जमीन दोस्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर 25 जोते तोडण्यात आले आहेत.
बल्याणी हे गाव महापालिका हद्दीत असून आंबिवली एनआरसी कंपनी ते बल्याणी असा मार्ग आहे. बल्याणीहून थेट पुढे गेल्यास हा मार्ग टिटवाळा रेल्वे स्थानकाकडे जातो. बल्याणीत अनेक ठिकाणी भूमाफियांनी चाळी उभारल्या आहे. या भूमाफियांनी टिटवाळा बकाल केला असल्याच्या आशयाचा रिपोर्टर ऑन दी स्पॉट या सदराखाली दै. लोकमतच्या हॅलो ठाणो पुरवणीत प्रकाश टाकण्यात आला होता. बल्याणी, उंभार्णी या गावात बेकायदा बांधकामे भरमसाठ उभारली आहेत. महापालिकेने घेतलेल्या तोडू कारवाई दरम्यान जी बांधकामे उभी राहत होती. त्याच्यावर कारवाईचा हातोडा उगारण्यात आला. ही तोडू कारवाई पुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती खुताडे यांनी दिली आहे. महापालिकेत रुजू असलेल्या बेकायदा बांधकामासाठीच्या पोलिस पथकाला सोबत घेऊन उपरोक्त कारवाई केली गेली आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त टिटवाळा पोलिस ठाण्याकडून घेण्यात आलेला नव्हता. जेसीबीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्त बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.