उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:07 AM2019-11-28T00:07:35+5:302019-11-28T00:08:02+5:30

उल्हासनगर शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी बुधवारी आझादनगर येथील मंडलिक चौकातील बांधकामांची पाहणी केली.

Illegal construction in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांना ऊत

उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांना ऊत

Next

उल्हासनगर - शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी बुधवारी आझादनगर येथील मंडलिक चौकातील बांधकामांची पाहणी केली. उपायुक्तांच्या पाहणीने भूमाफियांचे धाबे दणाणले असून अद्यापही महापालिकेने कारवाई केलेली नाही.

उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामाच्या असंख्य तक्रारी आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे येऊन याविरोधात पालिकेसमोर उपोषण झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोंडे यांनी काही बेकायदा बांधकामांची पाहणी केली असता, आरसीसी बांधकामाचे मजले उभे राहिलेच कसे? असा प्रश्न पडला. पाहणीनंतर त्यांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. तसेच याबाबत महापालिकेला माहिती कशी नाही, असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना केला. आझाादनगर मंडलिक चौक, पंजाबी कॉलनी, राम मॉलिशवाला परिसर, कॅम्प नं-२ झुलेलाल मंदिर, सोनारगल्ली यांच्यासह कल्याण ते बदलापूर मुख्य रस्ता आदींसह शहरातील विविध ठिकाणी बेकायदा बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत.

महापालिका बेकायदा बांधकामांच्या विरोधात विशेष मोहीम उघडणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे गणेश शिंपी यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी यांचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते बेकायदा बांधकाम सर्रासपणे करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या हस्तेक्षपामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहाच्या जागेवर व समाज मंदिराच्या जागेवर तीन मजली बेकायदा बांधकामे झाली कशी? अशी तक्रार कलानी यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.
माजी आमदारांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविणारे अधिकारी सामान्य नागरिकांसोबत कसे वागत असतील असे कलानी म्हणाल्या. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करणार असल्याचे कलानी यांनी पत्रकारांना सांगितले.

महापालिका उद्यानावर
बांधकाम परवाना?
शहरातील खुल्या जागा, आरक्षित भूखंड यांच्यासह पालिकेच्या उद्यानांवर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोटयवधींची जागा भूमाफियांच्या घशात घातली जात आहे. यामुळे शहर बेकायदा बांधकामांचे माहेरघर बनले असून आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त मदन सोंडे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बेकायदा बांधकामाची सहायक आयुक्त भगवान कुमावत पाहाणी करत असताना मनोज मोरे याने शिवीगाळ केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Illegal construction in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.