उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश
By सदानंद नाईक | Published: March 14, 2024 08:06 PM2024-03-14T20:06:15+5:302024-03-14T20:06:33+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील विकास कामात भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेक जणांचे जीव गेले असून शेकडो जण जखमी झाले. तसेच हजारो नागरीक बेघर झाले असून घर देता का घर असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील तब्बल २७ हजार बांधकामे नियमित होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्ययक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, चार्ली पारवानी, राजेश वधारीया, प्रकाश नाथानी आदीजन पत्रकार परिषद घेऊन शासनाने काढलेल्या अध्यादेशाची माहिती दिली. यावेळी आमदार आयलानी यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शहरातील धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित होणार असल्याची माहिती दिली.
शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम भरावे लागणार असल्याचे आमदार आयलानी म्हणाले. तसेच क्लस्टरचे धोरण शहरासाठी बदलण्यात आले असून १० चौ.मी. ऐवजी ४ हजार चौ.मी क्षेत्रफळ ठेवण्यात आले असून त्यामध्ये भविष्यात येणारे अडथळे दूर करण्यात येणार असल्याची माहितीही आयलानी यांनी दिली. भाजपच्या उपस्थित स्थानिक नेते माहिती देत असतांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील भ्रष्टाचाराबाबत बोलायचे आहे. असे म्हणून बोलण्यास लागताच, त्यांची इतर नेत्यांकडून समजूत काढण्यात आली आहे.
भाजपातील वाद चव्हाट्यावर
भाजपची पत्रकार परिषद सुरू असताना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. मात्र पत्रकार परिषदेत त्यांना इतर नेत्यांनी बोलण्यापासून रोखून त्यांची समजुत काढली. याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.