ठाण्यात ‘बीएसयूपी’तील घरांमध्ये बेकायदा बिऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:00+5:302021-09-16T04:51:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बीएसयूपी योजनेतील गरिबांच्या घरांमध्ये बेकायदा बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला आहे. ठाण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बीएसयूपी योजनेतील गरिबांच्या घरांमध्ये बेकायदा बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला आहे. ठाण्याच्या धर्मवीरनगर येथील बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
२०१३ मध्ये धर्मवीरनगर येथे बीएसयूपी योजनेंतर्गत उभारलेल्या आनंदकृपा सोसायटी, इमारत क्रमांक २३ मध्ये रहिवाशांना सदनिका दिल्या होत्या. सध्या या इमारती धोकादायक झाल्या आहेत. पाण्याच्या गळतीमुळे जागोजागी प्लास्टर निघाले आहे तर, इमारतीच्या अनेक भागात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. अवघ्या आठ वर्षांत इमारतीची झालेली दुरवस्था पाहून त्याच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच इमारतींमधील ६०३, ८०२, ८०४, ८०५ आणि ८०७ या सदनिकांचा बेकायदा ताबा घेतला आहे.
याबाबतची तक्रार मनसेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी याप्रकरणी ठामपा प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने बोटचेपे धोरण स्वीकारले. त्यामुळे पाचंगे यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली. माळवी यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या इमारतीमधील बेकायदा राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांचा पंचनामा केला आहे.
प्रशासनाने बेकायदा बिऱ्हाड थाटणारे बेकायदा सदनिकाधारक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पाचंगे यांनी पालिकेसह स्थानिक पोलीस ठाण्याला केली आहे.
-------------
संबंधितांवर फौजदारी कारवाईचे आश्वासन ठामपाने दिले आहे. तसे न झाल्यास मनसे आंदोलन छेडणार आहे. दरम्यान, इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे भविष्यात छप्पर कोसळून जीवितहानी झाल्यास पालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार असतील. त्यावेळी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- संदीप पाचंगे, विभागाध्यक्ष, मनसे
---