भाईंदरमध्ये सरकारी जागेत उभारलेले बेकायदा हॉटेल व लॉजिंग जमीनदोस्त
By धीरज परब | Published: July 12, 2024 06:58 PM2024-07-12T18:58:15+5:302024-07-12T18:58:33+5:30
Mira Bhayander News: भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत उभारलेले बेकायदा आलिशान हॉटेल , लॉजिंगसाठी खोल्या आदी बांधकामे शुक्रवारी महसूल विभागाने पालिका आणि पोलिसांच्या साहाय्याने जमीनदोस्त केली .
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत उभारलेले बेकायदा आलिशान हॉटेल , लॉजिंगसाठी खोल्या आदी बांधकामे शुक्रवारी महसूल विभागाने पालिका आणि पोलिसांच्या साहाय्याने जमीनदोस्त केली . तब्बल ३० ते ३५ गुंठे सरकारी जागेत अतिक्रमण केले गेले होते आणि त्याला वीज पुरवठा देखील दिला गेला होता .
भाईंदरच्या उत्तन भागातील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या सरकारी सर्वे क्र २०१ मधील जागेत भूमाफियांनी अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम चालवले होते . श्रमजीवी संघटनेचे सुलतान पटेल व वसीम पटेल यांनी तसेच अजय धोका ह्या नागरिकाने सरकारी जागेतील सदर बेकायदा आलिशान बांधकामावर कारवाईची मागणी चालवली होती.
उत्तनच्या तलाठी अनिता पाडवी यांनी देखील सरकारी जमीतील बेकायदा बांधकाम व त्यावर वर कारवाई बाबत वरिष्ठांना कळवले होते . दरम्यान लोकसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचार संहिते दरम्यान भूमाफियांनी सदर सरकारी जागेवर आलिशान बंगला सृदश हॉटेल , सुमारे १० ते १२ खोल्या आदी बांधकाम केले होते . सरकारी जागेतील बेकायदा बांधकाम असताना देखील त्याला वीज कंपनीने वीज पुरवठा केला होता . आलिशान हॉटेल व लॉजिंग खोल्यांना वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती .
शुक्रवारी अपर तहसीलदार निलेश गौड, मंडळ अधिकारी दीपक अहिरे , तलाठी अनिता पाडवी यांच्यासह पालिका उपायुक्त रवी पवार , प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह उत्तन सागरी पोलीस आदींनी दोन जेसीबीच्या सहाय्याने सरकारी जागेतील सदर बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली . सरकारी जागा बळकावून त्यात आलिशान बेकायदा बांधकामे करणाऱ्यात संतोष साठे उर्फ संतोष पाटील सह अन्य काही नावे सांगितली जात आहेत .
सदर जागा सातबारा नोंदी सरकारी असून इतर हक्कात प्रेस क्लब व पिकनिक स्पॉट साठी आरक्षित असल्याचे नमूद आहे अशी माहिती अपर तहसीलदार गौड यांनी दिली . शहरातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस कारवाई सह गुन्हे दाखल केले जाणार असून या संदर्भात महापालिका आणि वीज कंपन्यांना देखील पत्र देणार असल्याचे गौड यांनी सांगितले . सरकारी जागेत अतिक्रमण करून अनेक लॉजिंग , बार , आलिशान बंगले , वाणिज्य वापर आदीची बेकायदा बांधकामे झाली असून ती तोडून गुन्हे दाखल करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे .