दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू
By धीरज परब | Published: May 8, 2023 08:01 PM2023-05-08T20:01:31+5:302023-05-08T20:04:44+5:30
सदर बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता.
मीरारोड - मीरागाव नाक्यावर असलेल्या मानसी ह्या बेकायदा ऑर्केस्ट्रा बारचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या मागणीवरून पालिकेने जमीनदोस्त केले असताना आता त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले जात असल्याची तक्रार तेथील मीरा हाऊसिंग सोसायटीने पालिका व पोलिसांना केली आहे.
सदर मानसी बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता. सदर बेकायदा बारचे बांधकाम तोडण्याचे निर्देश जुलै २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी देऊन सुद्धा कारवाई झाली नव्हती.
ऑर्केस्ट्राच्या आड सादर बारमध्ये अश्लील नाच चालत असल्याच्या तक्रारी नंतर कोरोना काळात पोलिसांनी टाकली होती. त्यावेळी बारच्या आत बेकायदा गोपनीय खोली सापडली. त्यावेळी ६ बारबाला व १ तृतीयपंथी ची सुटका करून बारच चालक - मालक व कर्मचारी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या घटनेनं नंतर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानंतर मे २०२१ मध्ये पोलीस बंदोबस्तात पालिकेमार्फत सदर बार जमीनदोस्त केला होता. बार तोडल्या नंतर मोकळ्या झालेल्या काही जागेत पालिकेने रस्ता रुंद करून गटारचे बांधकाम केले.
पालिकेने बारचा परवाना रद्द केला शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली. मात्र दोन वर्षां पूर्वी तोडण्यात आलेला मानसी ऑर्केस्ट्रा बारच्या जागी पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरु झाल्याची तक्रार येथील रहिवाश्यांच्या गृहनिर्माण संस्थेने पालिका आयुक्त दिलीप ढोले, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम आदींना लेखी स्वरूपात केली आहे .