अवैध पार्किंगवर कारवाई करता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:41 AM2020-02-29T00:41:36+5:302020-02-29T00:41:45+5:30
एखादी जागा/वाहनतळ खरेदी करताना सभासदांचीही जबाबदारी आहे. आवश्यक सर्व कागदपत्रे, नकाशे पाहून व त्याची खातरजमा करूनच खरेदी करणे कायद्यानुसार अपेक्षित आहे.
एखादी जागा/वाहनतळ खरेदी करताना सभासदांचीही जबाबदारी आहे. आवश्यक सर्व कागदपत्रे, नकाशे पाहून व त्याची खातरजमा करूनच खरेदी करणे कायद्यानुसार अपेक्षित आहे.
मंजूर नकाशावर दाखवलेल्या वाहनतळांपेक्षा विकासकाने अधिक वाहनतळे दाखवून त्यांची विक्री सदनिकाधारकांना केली आहे व त्याचा ताबा दिला आहे. अशा अवैध वाहनतळांबाबत सहकारी संस्था काय कार्यवाही करू शकते?
- बाबासाहेब कराडे
आपण उपस्थित केलेला प्रश्न हा अनेक संस्था व सभासदांना भेडसावत आहे. या प्रकरणी संस्था व सभासद दोन्ही स्वत: अडचणीमध्ये आहेत, त्यामुळे कोणीच काही कार्यवाही करण्याच्या फंदात पडत नाही. परंतु आपण ही समस्या उपस्थित केली आहे व त्याचे उत्तर देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या सभासदांकडे योग्य व वैध वाहनतळ आहे त्याचा वापर करण्यास कोणतीही अडचण येऊ नये.
या प्रश्नाची उकल करावयाची असल्यास सर्वप्रथम मंजूर नकाशावर किती वाहनतळे आहेत त्याची पाहणी करावी; त्याचप्रमाणे मंजूर वाहनतळांप्रमाणे जागेवर / संस्थेमध्ये किती वाहनतळे आहेत याची खातरजमा करावी. एकदा का अशी खातरजमा झाली की मंजूर नकाशाप्रमाणे तशी आखणी जागेवर करावी; म्हणजे अयोग्य / अवैध किंवा अधिकची वाहनतळे आपोआप बाजूला जातील.
या ठिकाणी संस्थेने कोणताही दुजाभाव / भेदभाव न करता ज्या सभासदांकडे वैध / मंजूर नकाशाप्रमाणे वाहनतळ आहे त्यांचे वाहनतळ नियमित करावे व तसे पत्र त्यांना द्यावे. इतर सर्व सभासदांना मंजूर नकाशा, त्यांचे अवैध वाहनतळ याचे अवलोकन करावे व त्याप्रमाणे तसे पत्र देऊन त्यामध्ये काही अवधी देऊन त्यांच्या वाहनांना संस्थेमध्ये येण्यास मज्जाव करावा. म्हणजे ज्यांच्याकडे योग्य / वैध वाहनतळ आहे असेच सभासद वाहने वाहनतळामध्ये ठेवू शकतील. यानंतर प्रश्न निर्माण होणार तो म्हणजे अशा सभासदांचे हक्क व त्यांची झालेली फसवणूक याचा. त्यावर अशा सर्व सभासदांचा विकासकाविरुद्ध दावा करून त्यांचे पैसे / फसवणूक याकरिता आवश्यक सर्व मदत करावी. या ठिकाणी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे एखादी जागा / वाहनतळ इ. खरेदी करताना सभासद यांचीदेखील काही जबाबदारी आहे. त्यांची आवश्यक सर्व कागदपत्रे, नकाशे इ. पाहून व त्याची खातरजमा करूनच सदनिका / वाहनतळ खरेदी करणे कायद्यानुसार अपेक्षित आहे. सबब, ही बाब केवळ विकासकाने फसवणूक केली ही बोंब अयोग्य आहे. यामध्ये सभासदांचा निष्काळजीपणासुद्धा त्याला कारणीभूत आहे. सबब संस्थेने नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक व अपेक्षित आहे.
माझ्या पत्नीच्या नावे मीरा रोड येथे एक सदनिका आहे. करारपत्रामध्ये तिचेच नाव आहे. तिच्या गैरहजेरीत मला सर्वसाधारण सभा किंवा त्याची कार्यवाही यात भाग घेता येत नाही. समिती सदस्य मदत करीत नाहीत, नियम सांगत नाहीत, कृपया मार्गदर्शन करावे.
- विवराज रामटेके
आपल्या समस्येचे उत्तर कलम १५४ ब - १(१८)(स)मध्येच आहे. या कलमानुसार आपण स्वत: सभासदांचे पती असल्याने संस्थेकडे सहयोगी सभासद होण्यासाठी नमुना अर्जाद्वारे मागणी करू शकता. असा अर्ज संस्थेस त्यांच्या कार्यकारिणीमध्ये ठेवून त्यावर निर्णय घेता येईल व त्यायोगे आपणास सहयोग सभासद करण्याची योजना करता येईल. आपणास केवळ विहित नमुन्यामध्ये अर्ज, तसेच प्रवेश फी भरणे आवश्यक आहे. संस्थेने ठराव केल्यानंतर आपले नाव भाग दाखल्यावर नोंदविण्यात येते, परंतु आपल्या पत्नीचे नाव नेहमीच प्रथम राहील व आपले नाव त्यानंतर भागदाखल्यावर नोंदविण्यात येईल. याद्वारे आपणास केवळ सर्वसाधारण सभांना उपस्थिती मत देणे, कार्यकारिणीमध्ये सहभाग घेणे इ. कामे करता येतील. परंतु हे सर्व केवळ आपल्या पत्नीच्या संमतीने करावे लागणार आहे. याद्वारे आपले नाव जरी भाग दाखल्यावर नोेंदविले गेले तरी, आपणास सदनिकेसंबंधी कोणतेही हक्क प्राप्त होत नाहीत. होणार नाहीत़ आपण केवळ सहयोगी सभासद होणार असून पत्नीच्या अनुपस्थितीत त्यांच्या संमतीने संस्थेच्या कामामध्ये भाग घेण्यापुरतेच आपले अधिकार मर्यादित राहणार आहेत.
(या सदरासाठी वाचक आपले प्रश्न ’ङ्म‘ें३२ङ्मू्री३८2020@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.)