अवजड वाहनचालकांकडून अवैध वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:42 AM2021-01-12T00:42:08+5:302021-01-12T00:42:36+5:30
मध्यरात्रीनंतर टोळी सक्रिय : लाखो रुपयांची लूटमार; हप्ता वसुलीचा संशय
धीरज परब
मीरारोड : वरसावे पूल येथील घोडबंदर मार्गावर असलेल्या टोलनाक्याजवळ अवजड वाहनांकडून चक्क पावती देऊन शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवजड वाहनांकडून एन्ट्रीसाठी पावतीच्या आड केली जाणारी ही मुंब्रा पॅटर्न हप्ता वसुली असण्याचा संशय आहे.
टोलनाक्याच्या ठिकाणी टोल भरून अवजड वाहने पुढे सरकताच एक खासगी टोळी हातात पिवळ्या रंगाच्या पावत्या घेऊन उभी असते. सदर टोळी अवजड वाहनांना अडवते व त्यांच्याकडे ८०० रुपये जबरदस्तीने देऊन त्यांना पावती दिली जाते. रोज मध्यरात्रीपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ही टोळी पावती वसुली करतेय. ज्यांच्याकडे पावती असेल तर त्यांनाच सोडले जाते.
रविवारी मध्यरात्रीनंतर प्रस्तूत प्रतिनिधीने पाहणी केली असता टोल नाक्यालगत तिघेजण रस्त्यात उभे राहून अवजड वाहने थांबवून पिवळ्या रंगाच्या पावती पुस्तकाद्वारे पैसे वसुली करताना दिसले. त्यांच्यासाठी अनोळखी असलेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला पाहून त्यांनी पावत्या फाडणे लगेच बंद केले. त्यातील एका इसमास विचारणा केली असता त्याने आपण टोलनाक्याचा कर्मचारी असल्याचे सांगून तो टोल नाक्याकडे गेला. त्यापैकी एकजण दुभाजकावर बसून मोबाइल पाहू लागला. कडेला एक क्रेन उभी होती, तर दुभाजकाजवळ दुचाकीस्वार बराच वेळ होता. तो पोलीस असल्याचे वाटत होते.
एका वाहनाकडून ८०० रुपये
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पावती ही क्रेन सर्व्हिसची फाडली जाते. प्रत्येक अवजड वाहनांकडून ८०० रुपये घेऊन पावती दिली जाते. रोज सुमारे २५० ते ३०० वाहनांकडून ही वसुली केली जाते. महिन्याची एन्ट्री फी याआड सदर वसुली होते. महिन्याचे लाखो रुपये गोळा केले जातात. मुंब्रा बायपासवरदेखील रात्रीच्या वेळी क्रेनची ८०० रुपयांची पावती देऊन वसुली केली जात असल्याचे उघडकीस आले होते.