बेकायदा रिक्षांचा भिवंडीत मांडला उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:03+5:302021-03-01T04:48:03+5:30

नितीन पंडित : लाेकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्या लाॅकडाऊन लागल्यानंतर रिक्षाव्यवसाय ठप्प झाला हाेता. काेराेनाचा प्रभाव ...

Illegal rickshaws piled up in Bhiwandi | बेकायदा रिक्षांचा भिवंडीत मांडला उच्छाद

बेकायदा रिक्षांचा भिवंडीत मांडला उच्छाद

googlenewsNext

नितीन पंडित : लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्या लाॅकडाऊन लागल्यानंतर रिक्षाव्यवसाय ठप्प झाला हाेता. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू रिक्षांना काही बंधने घालून परवानगी देण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांनी ही बंधने धुडकावून आपल्या बेशिस्त वर्तनाचेच दर्शन घडवले आहे. काेराेना काळातील कसर भरून काढण्याचा चंग बांधून या रिक्षाचालकांनी सर्वसामान्य जनतेच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन लूट चालवली आहे. शहर आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. ग्रामीण भागात तर कहरच केला आहे. चार-पाच किमीच्या प्रवासासाठी प्रति माणसी १० वरून २० रुपये भाडेवाढ केली आहे. काही वेळा तर स्पेशल भाड्याच्या नावाखाली ८० ते १०० रुपये उकळले जात आहेत. ज्या निर्बंधांमुळे ही भाडेवाढ केली त्या निर्बंधांचा मात्र साेयीस्कर विसर पडला आहे.

कोरोना संकटामुळे रिक्षात कमी प्रवासी बसविण्यात यावे असे निर्देश आहेत. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा जागची हलतच नाही. भिवंडीत जवळपास सर्वच रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीची बाब पुढे करून भिवंडीत रिक्षाचालकांकडून स्वयंघोषित भाडेवाढ ही प्रवाशांच्या अंगवळणीच पडली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील अंजुरफाटा ते वडघर डुंगे खारबाव हा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आहे. यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. तर शहरात अंजुरफाटा ते वंजारपट्टी नाका या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल तीस रुपये माणसी मोजावे लागतात. याउपरही रिक्षाचालक दाेनच प्रवाशांना परवानगी असताना चार ते पाच प्रवासी काेंबून व्यवसाय करत आहेत. शिवाय, बेकायदा रिक्षाव्यावसायिकांचा विषय तर त्यापेक्षाही गहन बनला आहे. त्यांना काही नियम पाळायचे असतात हेच माहिती नसतात. वरून मुजाेरीही वाढली आहे. चालकांमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांची पिळवणूक हाेत आहे.

राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद

बेकायदा रिक्षाचालकांवर स्थानिक नेते, पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस मुजाेरी वाढली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची नेहमीच पायमल्ली होताना दिसते. त्यांच्या बेदरकार रिक्षा चालविण्यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.

काेट

काही दिवसांपूर्वी अंजुरफाटा येथून पायी जाताना एका रिक्षाचालकाने वाहन बेदरकारपणे चालवून धडक दिली. हा रिक्षाचालक मदत करण्याऐवजी माझ्याशी मुजोरीने वागला आणि जखमी अवस्थेत मला साेडून पळून गेला. रुग्णालयात उपचार घेताना नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस जबाबासाठी आले. पण त्या रिक्षाचालकावर काहीच कारवाई झाली नाही.

- कविता जाधव-उबाळे, पूर्णागाव

शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्याचे अधिकार आरटीओकडे असतात, आरटीओ, वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्डला परवानग्या दिल्या जातात. रिक्षा स्टॅंण्डवर २० ते २५ रिक्षा थांबण्याची परवानगी असते. शहरात अधिकृत २० ते २५ स्टॅण्ड आहेत. त्यामुळे शहरात ५०० ते ७०० किंवा हजारांच्या आतच अधिकृत रिक्षा असतील. मात्र आज शहरात पाच हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. तसेच त्या कोठेही उभ्या केल्या जात असल्याने वाहतूककोंडीही वाढली आहे.

- कल्याणजी घेटे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नारपोली अंजुरफाटा शाखा

Web Title: Illegal rickshaws piled up in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.