भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: November 23, 2022 02:55 PM2022-11-23T14:55:13+5:302022-11-23T14:55:55+5:30
ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
ठाणे: भिवंडीतील मडक्याचा पाडा भागातून पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या ट्रकसह तंबाखूजन्य पदार्थाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ठाणे पथकाने जप्त केल्याची माहिती कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी बुधवारी दिली. याप्रकरणी ट्रक चालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आंबाडी - भिवंडी रोडवर, नारायण फार्मच्या बाजूला, मडक्याचा पाडा, कवाड, या भागातून ठाणे -मुंबईकडे बेकायदेशीर तंबाखू जन्य पदार्थाचा साठा विक्रीसाठी नेला जात असल्याचे आढळले.
बंदी असलेल्या अन्नपदार्थात विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -१ तंबाखू आणि नावी तंबाखू आदींचा सुमारे एक कोटी आठ लाख पाचशे वीस रुपयांचा साठा आढळला. हा साठा तसेच ते वाहून नेणारा ट्रक अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालक परमेश्वर ढाकरगे (वय ३७, वर्षे, सध्या रा. दहिसर मुंबई, मुळ रा. परभणी) याच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चे कलम ५९ नुसार २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी या ट्रकचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या आदेशाने तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तअभिमन्यू काळे आणि कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.