बेकायदा गोदाम, गॅरेजचे फोफावले पीक; यंत्रणांचे दुर्लक्ष, आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 07:39 AM2020-12-21T07:39:10+5:302020-12-21T07:39:34+5:30
Thane : औद्योगिक पट्ट्यानजीक असलेल्या कल्याण-शीळ मार्गासह त्यालगतच्या ग्रामीण परिसराचा आढावा घेतला असता, जीवघेण्या भंगार गोदामांसह रस्त्यालगत थाटलेल्या गॅरेजमुळे येथील सुरक्षितता बेभरवशाची असल्याचे स्पष्ट होत आहे.
- प्रशांत माने
डोंबिवली : कंपन्यांना लागणाऱ्या आगींनी एमआयडीसी परिसर नेहमीच चर्चेत असताना भंगार गोदामांना लागत असलेल्या आगींनी एमआयडीसीलगत असलेला ग्रामीण भाग असुरक्षित असल्याचे ९ डिसेंबरला सोनारपाडा परिसरात घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. दुर्घटना घडली की यंत्रणांना जाग येते, राजकीय पुढारी ठोस कारवाईच्या गप्पा मारतात, पण घटनेला काही दिवस सरताच ‘येरे माझ्या मागल्या’ असे चित्र दिसते. औद्योगिक पट्ट्यानजीक असलेल्या कल्याण-शीळ मार्गासह त्यालगतच्या ग्रामीण परिसराचा आढावा घेतला असता, जीवघेण्या भंगार गोदामांसह रस्त्यालगत थाटलेल्या गॅरेजमुळे येथील सुरक्षितता बेभरवशाची असल्याचे स्पष्ट होत आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात, पण आता केवळ गुन्हे नकोत, ठोस कारवाई हवी, अशी मागणी होत आहे.
मानपाडा पंचक्रोशीचा पट्टा दशकभरापासून अवैध धंद्यांमुळे चर्चेत आहे. येथील बार संस्कृतीमुळे हा परिसर आधीच बदनाम असताना भंगार विक्रीसारख्या अवैध धंद्यांचेही पेव फुटले आहे. एमआयडीसीतील आगींच्या घटनांनंतर आता ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाहीत, याची प्रचिती याआधी ६ डिसेंबर २०१३ ला आली होती. दावडी गावातील एका गोदामात झालेल्या स्फोटांमध्ये तीन जणांचे बळी गेले होते, तर तीन जण जायबंदी झाले होते. या स्फोटांमुळे आजूबाजूचा ५ ते ७ किमीचा परिसर हादरला होता. शहरातील निवासी वसाहतींमध्येही भंगाराची गोदामे थाटलेली आहेत. काही वर्षांपूर्वी सूचकनाका परिसरातील महात्मा फुलेनगरमध्ये असलेल्या भंगार गोदामांना आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळीही आगीचे रौद्र रूप आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांची पळापळ झाली होती. आजही त्या ठिकाणी ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. स्थानिक रहिवासी मनोज वाघमारे यांनी या प्रकरणी केडीएमसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना वारंवार पत्रे दिली आहेत. एखादी घटना घडल्यावर काही दिवस सरताच अशा जीवघेण्या भंगार गोदामांवरील कारवाईचा विसर संबंधित यंत्रणांना पडताे, हे ९ डिसेंबरच्या घटनेने पुन्हा उघड झाले.
सोनारपाडा येथील गोदामाच्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गोदाममालकावर आणि अन्य गाळेधारकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केडीएमसीचे ई प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षद गुडदे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एकूणच मानपाडा हद्दीतील कल्याण-शीळ रस्ता असो अथवा ग्रामीण परिसर, या ठिकाणच्या अवैध धंद्यांवर केडीएमसी तसेच स्थानिक मानपाडा पोलीस यंत्रणेकडून ठोस कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
गॅरेज, रद्दीच्या दुकानांचा विळखा
कल्याण-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदा गॅरेज थाटण्यात आली आहेत. दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यालगत रद्दीची तसेच भंगार विक्रीची दुकाने असून रद्दीच्या सामानांचा मोठा साठा पाहता त्याला आग लागून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसी सर्व्हिस रोडवरही वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत. दावडी, सूचकनाका आणि आता सोनारपाडा परिसरात भंगार गोदामांना लागलेल्या आगीमुळे त्या ठिकाणी भंगारमाफिया सक्रिय असल्याचे उघड झाले असताना एकूणच मानपाडा हद्दीत अशा अनेक ठिकाणी लहान-मोठी गोदामे थाटली असल्याचे दिसत आहे.