बेकायदेशीररित्या वाहतूक होणारे १ कोटी ८९ हजारांचे विदेशी मद्य जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: June 2, 2023 06:58 PM2023-06-02T18:58:35+5:302023-06-02T18:58:46+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अवैध, परराज्यातील बनावट विदेशी मद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
ठाणे : गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कल्हेगाव येथे विदेशी मद्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या राजशेखर परगी (४१, वाहनचालक) आणि खजाहुसेन हित्तलमनी (५८, रा. हुबली, कर्नाटक) या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने जेरबंद केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून एक कोटी ८९ हजार ३६० रुपयांच्या मद्यासह एकूण एक कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अवैध, परराज्यातील बनावट विदेशी मद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर सह आयुक्त सुनिल चव्हाण, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तपासणी केली जात होती. दरम्यान, या मार्गावरील रायगड जिल्हयातील पनवेल तालुक्यातील कल्हेगाव येथे गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी परवानगी असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्याच आधारे शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ, संदीप जरांडे, जवान हनुमंत गाढवे आणि नारायण जानकर आदींच्या पकाने २ जून २०२३ रोजी गोवा मुंबई मार्गावर सापळा लावला होता.
याच कारवाईमध्ये एका कंटेनरच्या तपासणीत गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेल्या बनावट विदेशी एक कोटी ८९ हजार ३६० रुपयांचे मद्याचे एक हजार ५५७ बॉक्स आढळले. मद्यासह एक मोबाईल आणि एक वाहन असा एकूण एका कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कविभागाने दिली. परराज्यातील अवैध मद्य वाहतूकीसाठी वापरलेला १४ टायर्सचा कंटेनरही जप्त केला आहे. या मद्याच्या तस्करीमध्ये आणखी कोणती टोळी कार्यरत आहे का? याचाही तपास केला जात असल्याची माहिती डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.