नाल्यांवरील बांधकामे पावसाळ्यानंतर निष्कासित करणार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:56 PM2019-08-09T13:56:31+5:302019-08-09T14:06:33+5:30
नाल्यांवरील सर्व बांधकामे निष्काषित करण्याबरोबरच खाडी किनारी करण्यात आलेली सर्व भरणी काढून ती पूर्ववत करून खारफुटीची लागवड करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
ठाणे : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरील घरांमध्ये तसेच खाडीकिनारी वसलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये पाणी भरून मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज पावसाळ्यानंतर नाल्यांवरील सर्व बांधकामे निष्काषित करण्याबरोबरच खाडी किनारी करण्यात आलेली सर्व भरणी काढून ती पूर्ववत करून खारफुटीची लागवड करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
यावेळी पावसाळ्यामध्ये शहरातील नाल्यावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे नाल्यावरील दोन्ही बाजूला ३ मीटर अंतरामध्ये असलेली बांधकामे पावसाळ्यानंतर निष्काषित करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर दिवा, कळवा येथील खाडीकिनारी भरणी केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलातंरित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील खाडी किनारी ज्या ठिकाणी भरणी करून बांधकामे करण्यात आली आहेत, ती सर्व बांधकामे निष्काषित करून खाडी पूर्ववत करणे व त्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याच्या सूचना दिल्या.