मी नवखा उमेदवार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:54 AM2019-04-12T01:54:12+5:302019-04-12T01:54:14+5:30
बाबाजी पाटील : ३३ वर्षांनी स्थानिकाला संधी
कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीतील मी नवखा उमेदवार असल्याचा जो प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. माझ्यासाठी लोकसभा निवडणूक नवीन असली, तरी मी स्थानिक आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी विरोधकांना लगावला. तब्बल ३३ वर्षांनंतर या लोकसभा मतदारसंघाला स्थानिक उमेदवार मिळाला असून यावेळी स्थानिक उमेदवारालाच मतदारांकडून न्याय मिळेल, असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्रात गेल्या ११ ते १२ वर्षांपासून संचालक आहे. तीन वर्षे सहकारी बँकेचा चेअरमन राहिलो आहे. २००८ ते २०१४ या काळात शिक्षण मंडळ सदस्य म्हणून, तर सध्या ठाणे महापालिकेत प्रभाग क्रमांक २९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. लोकसभेसाठी नवीन चेहरा असलो, तरी सामाजिक कार्याचा आणि येथील स्थानिक प्रश्नांची मला चांगली जाण आहे.
मी नवखा असल्याचा जो माझ्याविरोधात प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील नवखेच होते. मात्र, त्यांना मतदारांनी स्वीकारले होते. यावेळी स्थानिक उमेदवार म्हणून मलाही न्याय मिळेल, असे पाटील म्हणाले. भूमिपुत्र असल्याने आगरी-कोळी समाज पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच इतरही समाज आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
नेवाळी आंदोलन, २७ गावे वगळण्याचा मुद्दा स्थानिक जनता विसरणार नाही. या प्रकरणांमध्ये सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षांत सरकारने आश्वासने दिली, पण पूर्तता केली नाही.
सरकारच्या विरोधात असलेला स्थानिकांचा रोष दि. २९ एप्रिलच्या मतदानातून दिसून येईल, असेही पाटील म्हणाले. मनसेच्या मतांचा आपल्याला फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक नेते कॉ. काळू कोमास्कर हे देखील उपस्थित होते.
शरद पवार २६ एप्रिलला कल्याण ग्रामीणमध्ये
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सभा दि. २६ एप्रिल रोजी प्रीमिअर कॉलनी ग्राउंडवर होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.