भ्रष्टाचाराचे आरोप करून नगरसेवकांनी केली प्रतिमा मलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:17+5:302021-09-09T04:48:17+5:30
भिवंडी मनपा आयुक्तांचे थेट नगरसेवकांना अल्टिमेटम... नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी मनपाच्या अखत्यारीतील उर्दू प्राथमिक शाळांमधील ...
भिवंडी मनपा आयुक्तांचे थेट नगरसेवकांना अल्टिमेटम...
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी मनपाच्या अखत्यारीतील उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या नगरसेवकांनी पुढील तीन दिवसांत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावे अन्यथा महापालिकेची प्रतिमा मलीन केल्याबद्दल कारवाईस सामोरे जावे, असा इशारा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे. आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्षाला तोंड फुटणार आहे.
बदल्यांमधील भ्रष्टाचाराला मनपा नगरसेवकांनी लेखी निवेदनाद्वारे विरोध केला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत बदल्यांच्या प्रस्तावास स्थगिती दिली. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना पुन्हा भिवंडी मनपा शिक्षण विभागात घेण्यात यावे तसेच इतर बदल्यांचे प्रस्ताव रद्द करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
स्थायी समितीने बदल्यांचा ठराव रद्द केल्यानंतर व पुरावे दिल्यानंतरही आयुक्तांनी नगरसेवकानी घेतलेल्या आक्षेपांची चौकशी करणे अपेक्षित आहे. मात्र नगरसेवकांनाच कारवाईच्या नोटिसा बजावणे हे अत्यंत चुकीचे व दुर्दैव आहे, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. आतापर्यंत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे त्या बाबतचे पुरावे आयुक्ताकडे दिले आहेत. मग त्यावर कारवाई का होत नाही. शिक्षक बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावेदेखील लेखी स्वरूपात आयुक्तांना दिले आहेत. आता आयुक्त नगरसेवकांवर काय कारवाई करतात याकडे आमचे लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली.
नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करावे. त्यांनतर या प्रकरणाची सखोल चौकशी निश्चितच करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
...........