सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचे अनुकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:53+5:302021-06-21T04:25:53+5:30
ठाणे : सावरकरांचे राष्ट्रप्रेम आणि सावरकरांची देशभक्ती याबरोबरच त्यांचे आजच्या काळाला अनुसरून असणाऱ्या विज्ञानवादी विचारांचा अधिक प्रचार-प्रसार झाला पाहिजे, ...
ठाणे : सावरकरांचे राष्ट्रप्रेम आणि सावरकरांची देशभक्ती याबरोबरच त्यांचे आजच्या काळाला अनुसरून असणाऱ्या विज्ञानवादी विचारांचा अधिक प्रचार-प्रसार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अनुवादक डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
व्यास क्रिएशन्स आयोजित सावरकर परिवार विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. आज विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रिया, तसेच सक्षमपणे घर सांभाळणारी स्त्री यांचे महत्त्व अधोरेखित करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराण्यातील स्त्रीरत्नांचा त्यांनी समर्पक शब्दांत गौरव केला. एक सामान्य वाचक आणि सावरकरप्रेमी म्हणून सावरकर विचारांच्या प्रसारासाठी काय काय करता येईल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता राजे, लेखिका आणि निवेदिका साधना जोशी, लेखक अनंत शंकर गोखले, राज्ञी महिला मंचच्या व्यवस्थापिका नेहा पेडणेकर, अभिजात नाट्यसंस्थेचे आकाश भडसावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘होय मी सावरकर बोलतोय’ या नाटकातील कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठा सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.
‘सावरकर साहित्य शृंखला’चा प्रारंभ
क्रांतिकार्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी, सावरकर घराण्याचा इतिहास, त्यांचा वैचारिक परिवार आणि सावरकर विचारांसाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि निष्ठावंत व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या या अंकाचे वैशिष्ट्य सांगून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती यावेळी व्यास क्रिएशनचे संचालक नीलेश गायकवाड यांनी दिली. सावरकर साहित्य शृंखला उपक्रमाचा प्रातिनिधिक प्रारंभ यावेळी करण्यात आला.
------------
फोटो मेलवर