‘अमृत’ योजना २७ गावांमध्ये तातडीने कार्यान्वित करा - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:21 AM2018-04-03T06:21:43+5:302018-04-03T06:21:43+5:30

कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 Immediately run 'Amrit' scheme in 27 villages - Eknath Shinde | ‘अमृत’ योजना २७ गावांमध्ये तातडीने कार्यान्वित करा - एकनाथ शिंदे

‘अमृत’ योजना २७ गावांमध्ये तातडीने कार्यान्वित करा - एकनाथ शिंदे

Next

डोंबिवली -  कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ग्रामीण भागातून शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काही राजकीय पक्षांची कार्यालये केवळ निवडणुकीसाठी असतात. शिवसेना मात्र बाराही महिने कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. केडीएमसीतील २७ गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. शिंदे, आमदार भोईर सातत्याने प्रयत्न करत असतात. या भागाच्या विकासासाठी शिवसेनेने अर्थसंकल्पात ५५० कोटींची तरतूद केली आहे. या भागातील रस्ते, अंतर्गत रस्ते यांची कामे तसेच अमृत योजना अशा विविध कामांना सुरुवात केली आहे. यामुळे नजीकच्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवलीतही क्लस्टर योजना मंजूर झाली पाहिजे. या योजनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला होता. बेकायदा इमारतींना क्लस्टर योजना कशी लागू करता येईल, असा प्रश्न विचारला जातो. अशा बेकायदा इमारतींतही नागरिक राहतात, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने क्लस्टर योजना आणली. या योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्याही आता दूर झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींसाठीही क्लस्टर मंजूर केले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
आमदार भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. शिंदे आणि महापौर देवळेकर यांची भाषणे झाली.

‘विरोधी पक्ष काहीच करत नाहीत’

राज्यात शिवसेना सत्तेत असूनही विरोध का करते, अशी टीका केली जाते. याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काही करत नाही व विरोधी पक्ष कमकुवत आहे.

त्यामुळेच शिवसेनेला विरोधी भूमिका घ्यावी लागते. शिवसेनेची बांधीलकी जनतेशी आहे. जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना सरकारमध्ये असूनही रस्त्यावर उतरते आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.

डोंबिवलीत घरच्यासारखे वाटते - अंकुश चौधरी

आमदार भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी व महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी चौधरी म्हणाले, डोंबिवलीत मी वारंवार येतो. कारण, इकडे आलो की, मला घरच्यासारखे वाटते.

एका गाण्यावर त्यांनी नृत्य करून रसिकांना खूश केले. आमदार भोईर यांचा जनसंपर्क दांडगा असून या कार्यालयामुळे अधिक संपर्क वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title:  Immediately run 'Amrit' scheme in 27 villages - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.