डोंबिवली पूर्वेत लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:02+5:302021-03-13T05:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविडच्या लसीकरणाला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या पूर्वेला कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकही लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोविडच्या लसीकरणाला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या पूर्वेला कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकही लसीकरण केंद्र नाही. पाथर्लीतील लसीकरण केंद्र अवघ्या पाच दिवसांतच बंद पडले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूर्वेला तातडीने लसीकरण केंद्रे वाढवावीत, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केली. त्यासाठी त्यांनी महापालिकेला चार पर्यायही सुचवले आहेत.
केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांची शुक्रवारी माजी नगरसेवक विशू पेडणेकर, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, राजन आबाळे यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी डोंबिवली पूर्वेत लसीकरण केंद्र नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिमखाना, सावळाराम क्रीडासंकुल, पाटीदार भवन आणि मढवी आरोग्य केंद्र अशा चार पर्यायी ठिकाणी लसीकरण तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर, महापालिका प्रशासनही कोविड लसीकरण केंद्र सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिमखाना व्यवस्थापनाकडे केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे पानपाटील यांनी सांगितले. त्याबाबत, माजी नगरसेवकांनीही जिमखान्याला पत्र द्यावे, असे आवाहनही पाटील यांनी केल्याचे पेडणेकर म्हणाले. त्यानुसार, भाजपकडूनही जिमखाना व्यवस्थापनाशी चर्चा होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू
क्रीडासंकुलात लसीकरण केंद्रे सुरू करणे शक्य नसल्याची माहिती डॉ. पानपाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. तेथे लसीकरण केंद्र सुरू करता येईल की नाही, याची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी तेथे गेले होते. परंतु, तेथे सध्यातरी पुरेशी जागा नाही. तसेच उन्हाचा तडाखा वाढत असल्याने उघड्या मैदानात मंडप टाकून केंद्र सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे क्रीडासंकुलात लसीकरण केंद्र होण्याची शक्यता धूसर असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. त्यामुळे जिमखाना येथे केंद्र सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-----------------