ठाण्यात १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:01+5:302021-09-16T04:50:01+5:30
ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती ...
ठाणे : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी पाच दिवसांच्या गणपती आणि गाैरींचे विसर्जन ठाण्यात पार पडले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणेश मूर्तींचे व गौरींचे विसर्जन केले. मनपा हद्दीतील विसर्जनस्थळांवर १४ हजार १२३ गणेशमूर्ती, ९६४ गौरींचे, तसेच गणेशमूर्ती स्वीकार केंद्रांत प्राप्त झालेल्या ६०० मूर्तींचे मनपातर्फे विधिवत विसर्जन करण्यात आले, तर पाचव्या दिवशी तीन हजार ६६८ नागरिकांनी डीजी ठाणेच्या ऑनलाइन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे मूर्तींचे विसर्जन केले.
ठामपाने रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, नीळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकूम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मीठ बंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगतच्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था आहे.
यावर्षी मनपाने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवीत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले.
---------