कृत्रिम तलावात विसर्जन केल्यास मिळणार महापालिकेचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:14+5:302021-09-15T04:46:14+5:30
मीरा रोड : पीओपीच्या मूर्ती टाळण्यासह कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेने केले हाेते. आता कृत्रिम तलावात ...
मीरा रोड : पीओपीच्या मूर्ती टाळण्यासह कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेने केले हाेते. आता कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना महापालिका आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे की, शहरातील तलावात दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यात मुख्यतः पीओपीच्या मूर्तींचा समावेश असतो. पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्याने पाण्यामध्ये केमिकल जाऊन तलावातील पाणी दूषित होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही बाब लक्षात ठेवून पालिकेमार्फत शहरात चार ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या दृष्टीने तेथे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मीरा रोडच्या शिवार उद्यान, भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान व नवघरच्या एस. एन. कॉलेजसमोर तसेच मीरा रोड स्मशानभूमी जवळील जॉगर्स पार्कमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव विसर्जन सोहळा पर्यावरणपूरक साजरा करणाऱ्या घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांना मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार आहे.