विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:49 AM2021-09-10T04:49:01+5:302021-09-10T04:49:01+5:30
कोरोनाची विशेष खबरदारी घेत गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या ...
कोरोनाची विशेष खबरदारी घेत गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
गुरुवारी सकाळी डॉ. शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट येथून कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची पाहणी करण्यास सुरुवात केली. गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे या दृष्टिकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू) आणि दिवा घाट येथे एकूण सात विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबर मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही नऊ प्रभाग समित्यांतर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणालीमार्फत ऑनलाइन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू झाली असून सदरची सुविधा www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
............