मीरा भाईंदर मध्ये गणेशोत्सवात १९ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन
By धीरज परब | Published: September 10, 2022 06:39 PM2022-09-10T18:39:53+5:302022-09-10T18:40:27+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये अनंत चतुर्दशी दिवशी २०६३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तर यंदाच्या गणेशोत्सव काळात १९ हजार ...
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये अनंत चतुर्दशी दिवशी २०६३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तर यंदाच्या गणेशोत्सव काळात १९ हजार गणेश मूर्तींचे शहरात विसर्जन करण्यात आले आहे .
मीरा भाईंदर महापालिकेने गणेश विसर्जन साठी दरवर्षी प्रमाणे शहरातील तलाव , खाडी , समुद्र, नदी अशा सुमारे २१ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती. शिवाय ३ कृत्रिम तलाव पालिकेने केले होते शहरात मूर्ती स्वीकृती केंद्र पालिकेने उभारली होती. विसर्जन स्थळी पालिकेने विसर्जनाच्या व्यवस्थेसह अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, सीसीटीव्ही, बॅराकेटींग आदी व्यवस्था केली होती. या शिवाय मंडप, आरती व्यवस्था, मोठ्या मुर्तींसाठी क्रेन, हायड्रा आदी यंत्रणा खाडी किनारी ठेवल्या होत्या. जेणे करून मोठ्या मुर्त्या उचलण्यास सहज झाले.
शहरात विसर्जन स्थळांवर आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार कोव्हिड बूस्टर डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. विविध विसर्जन स्थळांवर अधिकाऱ्यांना जबाबदारी नेमून देण्यात आली होती . आयुक्त ढोले यांच्यासह आमदार गीता जैन व पालिका प्रमुख अधिकारी यांनी विसर्जन स्थळांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला .
विसर्जन स्थळांवर व विसर्जन मार्गांवर पोलिसांसह होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त सदानंद दाते, उपायुक्त अमित काळे आदींनी विसर्जन स्थळांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. मध्यरात्री १२ नंतर मुख्य मार्गांवरील मिरवणुकांचे ढोल -ताशे व ध्वनिक्षेपक आदी पोलिसांनी बंद करायला लावत ध्वनी प्रदूषण अधिनियम आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान मध्यरात्री नंतर देखील अनेक मिरवणुका हळूहळू चालल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना विसर्जन स्थळी लवकर पोहचण्यास सांगितले .
शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांवर राजकारणी व संस्थांनी मंडप उभारले होते. अनेकांनी खाद्य - पेय पदार्थांचे वाटप चालवले होते तर काहीजण मंडप - स्टेज वरून स्वागत करत होते. रस्त्यांवरील खाद्य पेय पदार्थांच्या स्टॉल मुळे सर्वत्र कचरा, उष्टे पडून घाण पसरली होती. शनिवारी सकाळी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी कचरा गोळा करून रस्ते स्वच्छ केले. ह्या बेकायदा मंडप - स्टॉल मुळे विसर्जन मार्गांवर गर्दी झाली. ह्या स्टॉल ना संरक्षण दिल्या वरून नाराजी व्यक्त होत होती.
यंदाच्या गणेशोत्सवात एकूण १८ हजार ९६८ गणेश मूर्तींचे तर ३२३ गौरींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे . या पैकी १८९७ गणेश मूर्ती आणि १९ गौरींचे शहरात उभारलेल्या ३ कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.