अस्वच्छ तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन; केडीएमसीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:03 AM2018-09-20T04:03:48+5:302018-09-20T04:04:15+5:30

भाविकांमध्ये नाराजी, स्वयंसेवकांचे आरोग्य धोक्यात

Immersion of statues in unclean pools; Ignore KDMC | अस्वच्छ तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन; केडीएमसीचे दुर्लक्ष

अस्वच्छ तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन; केडीएमसीचे दुर्लक्ष

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीतील बहुतांश तलावांची देखभालीअभावी आधीच दुर्दशा झाली असताना गणेशोत्सवातही त्यांची योग्य प्रकारे निगा राखली जात नसल्याचे उघड झाले आहे. तलावांमधील शेवाळ, पाणवनस्पती तसेच सर्रास टाकले जाणारे निर्माल्य व पूजा साहित्य, यामुळे दुर्गंधी पसरली आहे. डासांचीही उत्पत्ती वाढल्याचे चित्र कल्याणमधील आधारवाडी आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा तलावाच्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविक आणि मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
महापालिका हद्दीत ६४ विसर्जनस्थळे आहेत. त्यात कल्याणमधील २७ आणि डोंबिवलीतील ३७ विहिरी आणि तलाव आहेत. कल्याणमध्ये चार, तर डोंबिवलीतील ११ कृत्रिम तलावांमध्येही मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले असले, तरी मोठ्या प्रमाणात खदाणी, तलाव आदी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यावर त्यांचा भर आहे.
‘कल्याण-डोंबिवलीतील तलावांची झाली डबकी’ या मथळ्याखाली विसर्जन तलावांच्या दुर्दशेचे वास्तव ‘लोकमत’ने नुकतेच मांडले होते. केडीएमसी प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेत गणेशोत्सवाच्या धर्तीवर तलावांच्या साफसफाईचे कंत्राट तातडीने मंजूर केले होते. परंतु, कंत्राटदारांकडून तलावांची स्वच्छता होते का, याची पाहणीही केडीएमसीकडून होत नाही. त्यामुळे तलावांची अस्वच्छता झालीच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आधारवाडी आणि खंबाळपाडा तलावांच्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळते. पाच दिवसांचे गणपती आणि गौरींचे सोमवारी या विसर्जनस्थळांवर मोठ्या थाटामाटात विसर्जन झाले. मात्र, तलावांमधील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आधारवाडी रोडवरील तलावात निर्माल्य, पूजेचे साहित्य आदींचा खच पडला होता. निदान गणेशोत्सव, त्यातही विसर्जनाच्या दिवशी तरी तलावांची स्वच्छता राखा, असा सूर तेथील भाविकांनी आळवला. तलावांच्या साफसफाईचे कंत्राट देऊनही स्वच्छतेबाबत हयगय होत असल्याने लाखो रुपयांचा चुराडा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर मूर्ती विसर्जन करणाºया स्वयंसेवकांच्या आरोग्याचा प्रश्न दूषित पाण्यामुळे ऐरणीवर आला आहे.

आमच्या श्रद्धेला पोहोचतोय धक्का
आम्ही बाप्पांची मनोभावे पूजा करतो, त्याच श्रद्धेने त्यांचे विसर्जन होवो, ही आमची इच्छा असते. परंतु, तलावांमधील दुर्गंधीयुक्त पाण्यात विसर्जन करावे लागते, ही दुर्दैवाची बाब आहे. आमच्या श्रद्धेलाही धक्का पोहोचत आहे.

तलावांतील दुर्गंधीमुळे निसर्गाचीही हानी होत आहे. जलजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया भाविक अलंकार तायशेट्ये यांनी दिली.

दीड, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनामुळे काही प्रमाणात निर्माल्य आधारवाडी तलावात राहिले असेल, तर याबाबत तत्काळ संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊन तलावाची स्वच्छता केली जाईल.
- रघुवीर शेळके, कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग, केडीएमसी

Web Title: Immersion of statues in unclean pools; Ignore KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.