लस उपलब्ध हाेताच आदिवासींचे प्राधान्याने लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:31+5:302021-05-11T04:42:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुक्यात खास करून बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व कातकरी वाड्या व १२ आदिवासी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : शहापूर तालुक्यात खास करून बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व कातकरी वाड्या व १२ आदिवासी पाड्यांतील नागरिकांना लस उपलब्ध होताच बिरवाडी येथे केंद्र सुरू करून त्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक भर’ या मथळ्याखाली साेमवारी ‘लाेकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे शहापूर तालुक्याची आराेग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डॉ. धानके यांनी या बातमीची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले़.
तालुक्यात कातकरी ही आदिम जमात राहते. अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, रुढी परंपरा यामध्येच हा समाज कायम गुंतलेला असल्याने शिक्षणापासून वंचित राहिला आहे. मजुरी करून पाेट भरायचे हेच त्यांचे नित्यकर्म ठरलेले आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे अख्खे जग संकटात सापडलेले असूनही या लोकांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. काेराेनावरील प्रतिबंधक लस घेण्यासही आदिवासी व कातकरी समाज राजी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. बिरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या १२ आदिवासीपाडे व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कातकरीवाडीतील लोकांचे व इतरांचे लसीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू वेहळे, उपसरपंच प्रकाश भेरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सासे, ग्रामसेवक कापसे यांनी केली आहे. लस उपलब्ध होताच बिरवाडी केंद्र ठरवून लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचे डॉ. धानके यांनी सांगितले. या लसीकरणामुळे या भागात तालुक्यातील आदिवासी व अधिक संख्येने राहत असलेल्या कातकरी या जमातीच्या भातसानगर, साजिवली, कुकांबे, बिरवाडी गावातील वाड्यांना व १२ आदिवासी पाड्यांना याचा मोठा फायदा होण्यासाठी प्रयत्न करून सर्वाधिक लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.