बोगस डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या समित्यांचीच तोतयागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:26+5:302021-09-02T05:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होऊन दाटीवाटीने लोक झोपडपट्टी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचे अज्ञान लक्षात घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होऊन दाटीवाटीने लोक झोपडपट्टी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचे अज्ञान लक्षात घेऊन ठिकठिकाणी बोगस डॉक्टरांनी गल्लीबोळात दवाखाने थाटले आहेत. त्यांनी मनमानी करून येथील रुग्णांच्या जिवाशी खेळ चालवलेला आहे. कडक कारवाई करून त्यांची मनमानी थांबवण्यासाठी सक्रिय असलेल्या या समित्यांकडूनच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सहा महापालिका क्षेत्रात या बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस जोरात सुरू आहे; पण त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या समित्यांना मात्र या डॉक्टरांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे दिसत आहे. गरिबी आणि अज्ञानाचा, गैरसमजाचा या बोगस डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जातो. रुग्ण गंभीर म्हणजे शेवटच्या घटका मोजत नाही, तोपर्यंत ते त्यांना अन्य रुग्णालयात पाठवत नाहीत, तोपर्यंत आपले बिलरुपी आर्थिक मीटर सुरू ठेवून त्यांची लूट करीत असल्याचे वास्तव काही जाणकारांनी कथन केले आहे. या बोगस डॉक्टरांकडून बऱ्याचदा रुग्ण दगावतोही; पण त्याची कोठे पुकार होऊ दिली जात नसल्याचे अनुभवही ऐकायला मिळत आहेत.
-------
१) जिल्ह्यातील अधिकृत रुग्णालये - १०६ रुग्णालये, दवाखाने. यापैकी कल्याणला नऊ रुग्णालये, दवाखाने आहेत. भिवंडीला ५२, अंबरनाथला तीन, शहापूरला २७ आणि मुरबाडला १५ दवाखाने व रुग्णालये अधिकृत आहेत.
२) वर्षभरात बोगस डॉक्टरांवर कारवाई - एप्रिलमध्ये अंबरनाथला एका बोगस डॉक्टरवर कारवाई झाली.
३) चार तालुक्यांत एकही कारवाई नाही- कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या चार तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही.
४) तालुका समितीत कोण कोण असते? - बोगस डॉक्टर शोधमोहीम समितीमध्ये गटविकास अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश आहे.
५) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा कोट-
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांपैकी अंबरनाथ तालुक्यात एका बोगस डॉक्टरचा शोध घेऊन कारवाई केली आहे. तालुकास्तरावरील सक्रिय शोध मोहीम समितीकडून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे.
- डॉ. मनिष रेंघेए जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे.