मुंब्र्यातील कोविड केंद्रांत अग्निप्रतिरोधक उपाययोजनांची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:22+5:302021-04-26T04:37:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : काही दिवसांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीत उपचारांसाठी दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : काही दिवसांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीत उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नाहक बळी गेले. अशा घटनेची पुनरावृत्ती मुंब्र्यातील कौसा भागातील मौलाना अबुल कलाम स्टेडियममध्ये होऊ नये, तसेच अपवादात्मक प्रसंगी अशी घटना घडल्यास त्याची अधिक झळ बसू नये यासाठी कोविड आरोग्य केंद्रामध्ये आग प्रतिरोधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
१८ एप्रिलला पुन्हा सुरू झालेल्या या केंद्राचे अग्निशमन दल, तसेच विद्युत विभागातील अधिकाऱ्यांकडून ऑडिट करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार येथील विविध ३० ठिकाणी मातीने भरलेल्या बादल्या, तसेच प्रति २०० लिटरप्रमाणे पाणी भरलेले पिंप ठेवण्यात आले आहेत. आग लागल्यास अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वी ती आटोक्यात कशी ठेवावी, यासाठी केंद्रामध्ये असलेल्या आगप्रतिबंधक साधनांचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी नुकतेच दिले आहे. या केंद्राजवळ असलेल्या; परंतु कोरोनामुळे सध्या बंद असलेल्या तरण तलावातील ५६ लाख लिटर पाणी गरज पडल्यास आग विझविण्यासाठी वापरता यावे यासाठी केंद्राच्या आजूबाजूला आठ ठिकाणी हायड्रो बसविण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून तलावातील पाणी वापरण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.