पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:51 PM2023-06-06T17:51:35+5:302023-06-06T17:52:43+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले.
किसनगरमध्ये १९९७ मध्ये झालेल्या साईराज इमारत दुर्घटनेनंतर क्लस्टरचे स्वप्न पाहिले. ते आता प्रत्यक्षात येत आहे. ठाण्यातच नव्हे, तर मुंबई, मीरा-भाईंदरलाही क्लस्टर राबविले जाणार आहेत. पावसाळ्यानंतर त्याला सुरुवात केली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे सोमवारी पार पडले. यावेळी दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीतील एका कुटुंबाच्या हस्तेही नारळ वाढवण्यात आला. क्लस्टर याेजनेचे कार्यालय कशीश पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र या योजनेवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
क्लस्टरमधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या १० पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली आहे. जी पुढील ५० वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले.
दरम्यान, प्रत्यक्षात घराची चावी दिली जाईल, तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा असेल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर त्यांनी पाठ थाेपटली असती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या याेजनेला तत्त्वत: मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी त्यातील त्रुटी दूर केल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्लॉट उपलब्ध केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
पहिल्या टप्प्यात १० हजार घरे
आता निवडणुका नाहीत, तरी प्रत्यक्षात क्लस्टरचे काम सुरू केले असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात दहा हजार घरे बांधणार असून, १,५०० हेक्टर जागेवर ही याेजना राबवली जाणार आहे.