विद्यार्थ्यांना पटवले कवितेतून शिक्षणाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:38 PM2019-09-21T22:38:17+5:302019-09-21T22:38:47+5:30
शिक्षण जनजागृती कविसंमेलन; खांडपे जि.प. शाळेत पार पडला कार्यक्रम
भिवंडी : शिक्षण जनजागृती कविसंमेलनाद्वारे ग्रामीण भागात शिक्षण, साक्षरतेचा प्रसार आणि प्रचार तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी शनिवारी भिवंडी तालुक्यातील भिनार केंद्रातील खांडपे जिल्हा परिषद मराठी शाळेत अनोखा उपक्रम घेण्यात आला. साक्षर करू गावं, आई मला शाळेला जायचं हाय, या कविता सादर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.
भिनार केंद्रप्रमुख निहाल शेख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. माझी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक विजयकुमार भोईर, युवा कवी मिलिंद जाधव, स्थानिक नागरिक सोमनाथ पाटील, मुख्याध्यापिका राधा येवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलम पाटील, सहशिक्षक प्रशांत भोसले, शिक्षिका जान्हवी तारे, निरूपा पाटील, साहित्यिक जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे, कवी चेतन जाधव, कवी माधव गुरव, शिक्षक, स्थानिक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
साहित्य व शिक्षण क्षेत्रात कालांतराने होणारे बदल याबद्दल शेख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यक्र मप्रसंगी कवी मिलिंद जाधव यांनी साक्षर करू गावं, आई मला शाळेला जायचं हाय, या कविता सादर केल्या. यावेळी विजयकुमार भोईर, भटू, रणखांबे, जाधव, गुरव यांनी शिक्षण जनजागृती, सावित्रीबाई फुले, अंधश्रद्धा, साक्षरता या विषयांवर आधारित स्वरचित कविता सादर करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रशांत भोसले यांनी, तर आभार केंद्रप्रमुख निहाल शेख यांनी व्यक्त केले.
‘शिक्षणाचा अधिकार सर्वांनीच बजावावा’
महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिस्थितीशी झुंज देत घेतलेल्या शिक्षणाचा इतिहास आपण डोळ्यांसमोर ठेवावा. त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांमुळेच आज आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहोत. शिक्षण ही मानवाच्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतीय राज्यघटनेमुळे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तो अधिकार सर्वांनी बजावावा, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.