बुद्धिमत्तेपेक्षा प्रयत्नांच्या चिकाटीला महत्व, डॉ. लहानेंनी सांगितला यशाचा कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:18 PM2018-09-03T17:18:36+5:302018-09-03T17:19:42+5:30
मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने ते अधोरेखित करावेत. विद्यार्थी व तरुण वर्गाकडून होणारा मोबाईलचा अतिवापर
मीरारोड – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा, कोणाचे प्रयत्न किती हे महत्वाचे असते, असे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी भाईंदरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. प्रयत्नांची चिकाटी, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा, आई - वडिलांचा आदर अशा मुल्यांचे आयुष्यातील महत्व सांगत अभ्यास करताना कोणत्या पद्धतीचा वापर करावा याचे मार्गदर्शनही डॉ. लहाने यांनी केले.
मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने ते अधोरेखित करावेत. विद्यार्थी व तरुण वर्गाकडून होणारा मोबाईलचा अतिवापर आणि जंकफूड सारख्या घटक गोष्टी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत एक लाख एकसष्ठ हजार ऑपरेशन न थकता, न सुट्टी घेता केली. बरा झाल्यावर पेशंटच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हाच खरा आयुष्यातला ठेवा असतो. दुसऱ्यांसाठी काहीतरी निरपेक्ष काम करा तेच तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या संघर्षमय आयुष्याचे किस्से ऐकवताना त्यांनी प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सांगितले. रक्तदानासाठी योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेल्या गौरवाबद्दल डॉ. लहाने यांनी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
दरम्यान, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, प्राचार्य डॉ. विष्णु यादव आणि सर्व प्राध्यापक वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. निमेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.